आपला जिल्हा
ओबीसी आरक्षण बचाव मोर्चात मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन……..!
डी डी बनसोडे
December 5, 2020
केज दि. ५ – विचार उद्याचा ओबीसींच्या भविष्याचा, तुमच्या आमच्या अस्तित्वाचा……असा एल्गार पुकारात अखिल भारतीय समता परिषद बीड तसेच इतर सर्व ओबीसी संघटनांच्या वतीने ओबीसी आरक्षण बचाव मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून सदरील मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केज तालुक्यातील ओबीसी पदाधिकारी तसेच ओबीसी बांधवांनी केले आहे.
मागच्या कांही दिवसांपासून महाराष्ट्रात आरक्षण संघर्ष दिवसेंदिवस वाढतच आहे. अनेक समजुती गैरसमजतीतून सामाजिक संघर्ष निर्माण होऊ लागला आहे. अनेक तथाकथित पुढारी तथा सामाजिक कार्यकर्ते वेगवेगळे बोलत असल्याने ओबीसी विरुद्ध मराठा असे चित्र निर्माण होत आहे. तर कांही लोक ओबीसींमधूनच आम्हाला आरक्षण हवे असे बोलताना दिसत आहेत. मात्र सध्या ओबीसींना जेवढे आरक्षण आहे त्यातच सुमारे पाचशेच्या वर विविध सामाजिक घटक समाविष्ट असल्याने ओबीसींनाच त्याचा अल्प प्रमाणात लाभ मिळत आहे. आणि त्यात पुन्हा कांही समाज घटक समाविष्ट झाले तर ओबीसींवर मोठा अन्याय होणार आहे.
दरम्यान सध्या असलेल्या आरक्षणावर गदा येऊ नये यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात ओबीसी आरक्षण बचाव मोर्चाचे आयोजन करण्यात येत आहे. आणि याचाच एक भाग म्हणून ऍड. सुभाष राऊत यांच्या नेतृत्वाखाली बीड जिल्ह्यातील अखिल भारतीय समता परिषद तसेच इतर ओबीसी संघटनांच्या वतीने दि. ८ डिसेंबर (मंगळवार) रोजी सकाळी ११ वाजता महात्मा फुले पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालय दरम्यान मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. सदरील मोर्चात समस्त ओबीसी बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन समता परिषद सह केज तालुक्यातील इतर ओबीसी संघटनांच्या वतीने करण्यात आले आहे.