आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र
”तो” रस्ता मला त्रास देतो म्हणत महिलेची थेट पोलिसात तक्रार………न्यायालयात जाण्याचीही इशारा……!
औरंगाबाद दि.७ – सर्वसामान्य लोकांना दिलासा देणाऱ्या किमान गोष्टीतरी राजकीय पुढारी तसेच लोकसेवकांनी करणे गरजेचे असते. मात्र नागरिकांचा संयम पाहू इच्छिणारे लोक प्रतिनिधी स्वाहाकार करण्यात मग्न झालेले असल्याने सामान्य लोक वैतागले आहेत. आणि अशाच एका वैतागलेल्या महिलेने चक्क रस्त्या विरोधात पोलिसात तक्रार देऊन प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले असून रस्ता दुरुस्तीची किमान अपेक्षा ठेवली आहे.
दरम्यान आतापर्यंत आपण महिलेच्या छेडछाडीच्या तक्रारी पाहिल्या आहेत. तक्रारींमध्ये तो मला त्रास देतोय, तो मला छळतोय, त्यामुळे माझा शाररिक आणि मानसिक त्रास होतोय असे नमूद केलेले असते. मात्र, औरंगाबादच्या फुलंब्री पोलिसात एका महिलेने अशीच एक तक्रार रस्त्या विरोधात केली आहे.
औरंगाबाद शहरात राहणाऱ्या संध्या घोळवे-मुंडे या फुलंब्री येथील ग्रामीण रुग्णालयात प्रयोगशाळा तंत्रज्ञ म्हणून काम करतात. गेल्या 14 वर्षांपासून रोज औरंगाबाद ते फुलंब्री असा प्रवास करतात. गेल्या काही वर्षांपासून रस्त्याचे चौपदरी करण आणि नवीन रस्त्याचे काम सुरू करण्यात आले. मात्र संथ गतीने काम सुरू असल्याने तसेच रोज त्रास सहन करावा लागत असल्याने संध्या यांनी थेट पोलीस स्टेशनलाच तक्रार दिली.
दरम्यान संध्या घोळवे – मुंडे यांनी पोलिसांत तक्रार देत असताना हा रस्ता मला मानसिक, शारीरिक, आर्थिक त्रास व्हावा या हेतूने धक्का बुक्की व अडवणूक करीत आहे, तो सुधारेल अशी मला अशा होती. मात्र, तसे न होता हा रस्ता दिवसोदिवस प्राणघातक बनत चालला आहे. त्यामुळे माझ्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. रस्त्यामुळे अनेक प्रकारच्या वेदना रोज सहन कराव्या लागत आहे. आमच्या भावना प्रशासनापर्यंत पोहोचण्यासाठी हा मार्ग निवडला, प्रशासनाने या बाबत संबंधितांवर कारवाई केली नाही तर न्यायालयात दाद मागणार असल्याच संध्या घोळवे-मुंडे यांनी सांगितले.