अर्णब गोस्वामींची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली…….!
नवी दिल्ली दि.7 – रिपब्लिकविरोधात दाखल करण्यात आलेले गुन्हे रद्द करून तपास सीबीआयकडे हस्तांतरित करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयानं मागणी फेटाळून लावत याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार दिला आहे.
रिपब्लिक वृत्तवाहिनीविरुद्ध महाराष्ट्र पोलिसांकडून विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्याचबरोबर रिपब्लिकमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचीही चौकशी पोलिसांकडून केली जात असून, याविरोधात गोस्वामी यांच्या रिपब्लिकने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.
न्यायालयाने रिपब्लिकविरोधात दाखल करण्यात आलेले गुन्हे रद्द करण्याची मागणी फेटाळून लावली. त्याचबरोबर या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याच्या मागणीलाही न्यायालयाने नकार दिला.
ही याचिका महत्त्वाकांक्षी असल्याचं दिसत आहे. आपली इच्छा आहे की, महाराष्ट्र पोलिसांनी कोणत्याही कर्मचाऱ्याला अटक करू नये. त्याचबरोबर हे प्रकरण तपासासाठी सीबीआयकडे सोपवण्यात यावं. यात हेच चांगले होईल की, आपण ही याचिका मागे घ्यावी, असं न्यायालयानं सुनावलं. त्यानंतर याचिकाकर्त्यांनी याचिका मागे घेतली.