राजकीय
”ते” तर मोठ्या माणसांचा पदर धरून पुढे आलेत……….! जावयाचा सासऱ्यावर प्रहार……..!
बीड दि.१२ – औरंगाबाद येथील शिवाजीनगर भागातील पाण्याच्या टाकीवर चढून प्रहार संघटनेतील कार्यकर्ते आंदोलन करत होते. या आंदोलनाला रावसाहेब दानवे यांचे जावई हर्षवर्धन जाधव यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी दानवे यांच्यावर जोरदार टीका केली.
रावसाहेब दानवे यांचं कर्तृत्व शून्य आहे. मागे प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांचे तर आता नरेंद्र मोदी यांच्या आशीर्वादावर ते निवडून येतात, असं म्हणत हर्षवर्धन जाधव यांनी रावसाहेब दानवे यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.
मोठ्या माणसाचा पदर धरून गावगुंड जसे मोठे होतात तसेच ते पुढे आले आहेत. यामुळे सत्ता कधीच जाणार नाही या अविर्भावात त्यांचे वर्तन असते. यातूनच त्यांचे शेतकरी विरोधातील विधान असून त्यांनी शेतकऱ्यांची तात्काळ माफी मागावी, अशी मागणी जाधव यांनी केली आहे.
दरम्यान, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांची जाहीर माफी मागावी. जर दुपारी 4 वाजेपर्यंत माफी मागितली नाही, तर आम्ही पाण्याच्या टाकीवरुन उड्या मारु, असा इशारा या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दिला.