आपला जिल्हा
केज येथे दिव्यांग शाळेतील शिक्षकाचा मृत्यू…..!
आर्थिक तणावातून मृत्यू झाल्याची कुटुंबियांची माहिती
बीड दि.१३ – केज तालुक्यातील उमरी येथील मतिमंद निवासी विद्यालयातील विशेष शिक्षक सईद हरणमारे (वय 38) रा. चाकूर या कर्मचाऱ्याचा आर्थिक तणावातून दि.१२ रोजी दुपारी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली.
मागच्या एक वर्षापासून शासनाने त्रुटींमुळे बीड जिल्ह्यातील 24 शाळा बंद केल्या आहेत. तर अनेक शाळेतील कर्मचाऱ्यांचे समायोजनही केलेले नाही. त्यामुळे एक वर्षापासून सईद हे वेतन बंद असल्यामुळे मानसिक व आर्थिक तणावात होते. त्याचाच त्यांना ताण सहन न झाल्याने मृत्यू झाला असे त्यांच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे.
दरम्यान त्यांचे वडिलांचाही मागच्या वर्षीच मृत्यू झालेला असून त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असे कुटुंब असून त्यांची परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. तसेच शासनाने 2005 नंतर जुनी पेन्शन बंद केलेली आहे आणि डीसीपीएस कपातीचा शासनाचा हिस्साही कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा केलेली नाही. तो हिस्सा तात्काळ जमा व्हावा आणि किमान आता तरी समाज कल्याण मंत्री यांनी तात्काळ संस्थेच्या अपिलावर निर्णय घ्यावा. तसेच कर्मचाऱ्यांचे समायोजन करावे जेणेकरून इतर हजारो कर्मचाऱ्यांचा मानसिक व आर्थिक ताण थांबेल अशी मागणी संबंधित शाळेतील कर्मचारी करत आहेत.