क्राइम
केज तालुक्यात कर्जबाजारीपणास कंटाळून तरुणाची आत्महत्या
बीड १५ – केज तालुक्यातील आडस येथील शेतकऱ्याने कर्जबाजारीपणा व कुटुंबीयांनी जमीन विकण्यास विरोध केल्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना मंगळवार (दि.१५) रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव महादेव आश्रुबा गिरी (वय-३४) असल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे.
तालुक्यातील आडस शिवारात महादेव गिरी यांना वडीलोपार्जीत जमीन आहे. मोठा भाऊ व्यवसायासाठी बाहेर गावी असल्याने तोच शेती पहात होता. मात्र सततच्या नापीकीमुळे त्याच्याकडे खाजगी व बँकेचे कर्ज होते. त्यामुळे कर्ज फेडण्यासाठी जमीन विक्री काढली होती. मात्र जमीन विकण्यास कुटुंबीयांनी विरोध केला होता. त्यातच जमीन विक्रीस काढल्याने त्यांच्या दोन्ही पत्नी कांही दिवसांपूर्वी माहेरी निघून गेल्या. त्यामुळे तो आई व मुलांसह राहत होता. अशा परिस्थितीत तो मानसिक तणावात होता. यातून त्याने गावाजवळील शेतात राहत असलेल्या घरातील पत्र्याच्या आडूस गळफास लावून मंगळवारी सकाळी अंदाजे अकरा वाजण्याच्या सुमारास आत्महत्या केली. कांही वेळानंतर त्याचा मित्र घरी गेला असता घर आतून बंद होते. हाका मारल्या मात्र कांहीच प्रतिसाद न मिळाल्याने दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. घटनेची माहिती मिळताच पोलीस नाईक अनंत अडागळे, तेजस ओव्हाळ यांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला. मयताचा भाऊ रामदास गिरी याने दिलेल्या माहितीवरून धारुर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्याच्या
पश्चात आई, दोन पत्नी, दोन मुली व दोन मुले असा परिवार आहे. घटनेचा पुढील पोलीस शिपाई तेजस ओव्हाळ हे करीत आहेत.