क्राइम
डी डी बनसोडे
December 20, 2020
केज तालुक्यातील मांजरा पट्ट्यात वाळू चोरी, पोलिसात गुन्हा दाखल

बीड दि. २० – केज महसूल विभागाने मांजरा पट्ट्यातील वाळू चोरा विरुद्ध कारवाई केली असून वाळू चोरी प्रकरणी पोलीसात तक्रार केली आहे.
मांजरा पट्ट्यातील अवैद्य वाळू चोरी रोखण्यासाठी मंडळ अधिकारी भागवत पवार, तलाठी किसन देशमुख व माणिक पवार हे दि.१९ डिसेंबर २०२० रोजी दुपारी २ वाजता पथक गस्त घालीत असताना त्यांना मांजरा नदी पात्रात इस्थळ व सौंदना शिवारात एक विना नंबर प्लेटच्या ट्रॅक्टर ट्रॉली मध्ये चार पुरुष व एक महिला हे वाळू भरीत असताना आढळून आले. गस्ती पथक दृष्टीस पडताच वाळू खाली टाकून ते पळून जाण्यात यशस्वी झाले. दरम्यान मंडळ अधिकारी तथा पथक प्रमुख भागवत पवार, तलाठी किसन देशमुख व माणिक पवार व वाहन चालक गणेश डबरे यांनी वाळू व साहित्य जप्त करून सदर वाळू उपसा प्रकरणी तपास करून माहिती घेतली असता सदरील अनाधिकृत वाळू उपसा करणारे ट्रॅक्टर हे इस्थळ येथील विकास विठ्ठल कांबळे यांच्या मालकीचे असल्याचे समजले. त्यानुसार मंडळ अधिकारी भागवत पवार यांनी युसुफवडगाव पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादी नुसार गुन्हा दाखल झाला असुन सहाय्यक पोलीस निरीक्षक आंनद झोटे यांच्या मार्गदर्शनाखाली पांडुरंग वाले हे पुढील तपास करीत आहेत.