काय आहे बॉक्सिंग डे क्रिकेट सामना ? 26 डिसेंबर रोजी खेळावला जाणारा सामना असणार बॉक्सिंग डे……..!

बीड दि.23 – मालिकेतील दुसरा कसोटी सामना हा 26 डिसेंबरला मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर खेळण्यात येणार आहे. ही बॉक्सिंग डे क्रिकेट सामना असणार आहे. हा बॉक्सिंग डे क्रिकेट काय प्रकार आहे, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. बॉक्सिंग डे क्रिकेट ही भानगड नेमकी काय आहे ? हे पहा……!
सामान्यतः क्रिकेट विश्वात ख्रिसमसनंतर 26 डिसेंबरला खेळण्यात येणाऱ्या कसोटी सामन्याला बॉक्सिंग डे क्रिकेट असं म्हटलं जातं. या बॉक्सिंग शब्दामुळे हा सामना बॉक्सिंगशी संबंधित आहे की काय, असंही अनेकांना वाटतं. पण तसं नाहीये. या बॉक्सिंगचा संबंध ख्रिसमस बॉक्सशी आहे. जगातील अनेक देशांमध्ये ख्रिसमसनंतरच्या दुसऱ्या दिवसाला (26 डिसेंबर) बॉक्सिंग डे असं म्हटलं जातं. या दिवशी अनेक जण नातेवाईक आणि मित्रांना बॉक्स भेट देतात. ही परंपरा गेल्या काही दशकांपासून सुरु आहे. त्यामुळे 26 डिसेंबरला होणाऱ्या कसोटी सामन्याला बॉक्सिंग डे क्रिकेट असं म्हटलं जातं.
दरम्यान बॉक्सिंग डे आणि क्रिकेटचा संबंध हा तब्बल 128 वर्षांपासूनचा आहे. मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर 1892 मध्ये शेफील्ड शील्डचा एक सामना खेळण्यात आला. त्यामुळे व्हिक्टोरिया आणि न्यू साऊथ वेल्समध्ये ख्रिसमसदरम्यान क्रिकेट सामने खेळण्याचा पायंडा पडला. दरम्यान मेलबर्नमध्ये पहिला आंतरराष्ट्रीय सामना 1950 मध्ये खेळण्यात आला होता. हा सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेले ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात खेळण्यात आला होता. हा सामना 22 डिसेंबरला खेळण्यात आला होता.