अंबड दि.२४ – तालुक्यात झालेल्या ठिबकसिंचनची सखोल चौकशी करावी अशी मागणी युवा मल्हार सेनेचे रामेश्वर खरात यांनी जिल्हाकृषी अधीक्षक यांना पत्राद्वारे केली आहे.
भारत देश हा कृषिप्रधान देश आहे. देशाची अर्थव्यवस्था कृषी व्यापारावर अवलंबून आहे, त्यामुळे शेतकरी सुधारला पाहिजे, शेतीची उन्नती झाली पाहिजे या विचाराने कुठल्याही पक्षाचा सरकार येवो परंतु शेतीसाठी व शेतकऱ्यांसाठी सतत नवनवीन योजना आणून देश सुखी व समृद्ध करण्याचा विचार सरकारच्या धोरणांमध्ये असतो. परंतु केंद्र आणि राज्य सरकारने घोषित केलेल्या योजना खरंच शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतात का ? पोहोचल्या तरी त्या योजनांचा प्रवास शेतकऱ्यांना किती खडतर होतो ? प्रत्येक विभागातील कर्मचारी अधिकारी शेतकऱ्यांची किती प्रमाणात पिळवणूक करतात हे आपणा सर्वांना माहीत आहे. अंबड तालुक्यात मागील पाच वर्षांपासून ठिबकसिंचन मध्ये फार मोठ्या प्रमाणात अनियमितता झालेली आहे. एखाद्या शेतकऱ्याने एक एकर ठिबक केले व त्याचा सातबारा एकर पेक्षा जास्त असेल तर बाकी जमिनीवर शेतकऱ्याला न सांगता सबसिडी काढण्यात आलेली आहे. तर काही प्रकरणात सातबारा एकाच्या नावाचा व जिओ टॅगिंग दुसऱ्याच्याच शेतात, तसेच ठिबकची नळी फिल्टर वॉल पीव्हीसी पाईप व इतर मटेरियल आय एस आय नामांकित कंपनीची न वापरता नॉन आय एस आय वापरण्यात आले आहे. असे अनेक प्रकार अंबड तालुक्यात घडले आहेत.

सदरील प्रकाराची चौकशी करावी व जो अधिकारी किंवा कर्मचारी यास जबाबदार आहे त्याच्यावर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी युवा मल्हार सेनेचे रामेश्वर खरात यांनी केली आहे.