दि. २३ डिसेंबर रोजी सायंकाळी ६:०० वा. च्या दरम्यान अर्चना रामराव वायकर ही २५ वर्षीय महिला त्यांच्या धायचरा नावाने ओळखल्या जात असलेल्या शेतातून डोक्यावर सरपण घेऊन येत असताना तिला रस्त्यात अडवून एकाने मागून केस ओढले व दुसऱ्याने तिचे तोंड कपड्याने बांधून ओढीत ज्वारीच्या पिकात घेऊन गेले. त्या ठिकाणी ज्वारीच्या शेतातही दोन इसम थांबलेले होते. त्यांनी तिला ओरडल्यास जीवे मारून टाकण्याची धमकी दिली व गळ्यातील मंगळसूत्र, गंठण आणि कानातील झुंबर असे सुमारे पंचविस हजार रु. किंमतीचे दागिने काढून घेत पोबारा केला. या प्रकारामुळे घाबरून अर्चना वायकर ही शेतात बेशुद्ध पडली. त्या नंतर घरच्या लोकांनी तिचा शोध घेतला असता ती त्यांना आढळून आली. नंतर तिच्यावर केज येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात आले.
दि.२५ डिसेंबर रोजी केज पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादी नुसार केज पोलीस स्टेशनला गु.र.न. ५५२/२०२० भा.दं.वि. ३९२, ५०६, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक श्रीराम काळे व हेडकॉन्स्टेबल दिनकर पुरी हे तपास करीत आहेत.