क्राइम
जुन्या भांडणावरून चिंचोलीमाळीत दोन गटात हाणामारी
आठ महिलांसह १८ जणांविरुद्ध परस्परविरोधी गुन्हे
डी डी बनसोडे
December 26, 2020
केज दि.२६ – जुन्या भांडणाच्या कारणावरून दोन गटात एकमेकांवर दगडफेक करीत हाणामारी झाल्याची घटना केज तालुक्यातील चिंचोलीमाळी येथे घडली. याप्रकरणी केज पोलिसात आठ महिलांसह १८ जणांविरुद्ध परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले आहेत.
चिंचोलीमाळी येथील सर्जेराव छबुराव मगर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ते व त्यांची पत्नी हे दोघे पिकांना पाणी देत असताना विठ्ठल मगर, राहुल मगर, अमोल मगर, सुरेखा मगर हे आले. त्यांनी ‘तु सहा महिण्याखालीच आमच्याकडुन वाचला होतास, तुला आता आम्ही सोडत नाहीत असे म्हणत त्यांच्या पाठीमागे लागल्याने हे दोघे पती – पत्नी त्यांच्या घरी आले. यावेळी वरील चौघांसह ऋषिकेश मगर, अविनाश मगर, वैशाली मगर, उर्मिला मगर यांनी शिवीगाळ करीत त्यांच्या दिशेने दगडफेक केली. ते घरात असल्याने त्यांना दगडे लागली नाहीत. ते जीवे मारण्याची धमकी देऊन निघून गेले. अशी फिर्याद सर्जेराव मगर यांनी दिल्यावरून वरील आठ जणांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
दुसऱ्या गटाचे विठ्ठल नारायण मगर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ते घरासमोर असताना सर्जेराव मगर, शोभा मगर, मीना मगर, आशा मगर, शेषाबाई मगर, सीताबाई मगर, विकास मगर, लिंबराज मगर व विद्याबाई सावंत, भास्कर सावंत ( दोघे रा. सावंतवाडी ता. केज ) यांनी जुन्या भांडणाची कुरापत काढून शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली. अशी फिर्याद विठ्ठल मगर यांनी दिल्यावरून वरील दहा जणांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस निरीक्षक प्रदिप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जमादार अमोल गायकवाड व पोलीस नाईक अशोक गवळी हे पुढील तपास करत आहेत.