क्राइम
ग्रामपंचायतीने घेतला महिलेला गावातून हद्दपार करण्याचा ठराव, गेवराई तालुक्यातील धक्कादायक प्रकार……..!
बीड दि.29 – जिल्ह्यात महिला अत्याचाराच्या घटना वाढत असतानाच आता चक्क एका अत्याचार प्रकरणातील पीडित महिलेलाच व्यभिचारी ठरविण्याचा प्रकार ग्रामपंचायतीने केला आहे. देशभरात टाळेबंदी असताना गेवराई तालुक्यातील पाचेगाव ग्रामपंचायतीने चक्क एका महिलेला व्याभिचारी ठरविणारा ठराव घेतला आहे. ग्रामपंचायतीच्या या भूमिकेबद्दल महिला वर्गातून संताप व्यक्त होत आहे. गेल्या चार वर्षांपुर्वी एरडगाव शिवारात एका महिलेवर अत्याचार झाला होता. या प्रकरणी चौघांना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. यांचाच राग मनात धरून गावातील लोकांनी या महिलेला गावातून हाकलून देण्याकरीता चक्क ठराव घेतला. या ठरावात या महिलेचे चारित्र्यावर शिंतोडे उडवण्यात आले. कोणत्याही गावाला अथवा ग्रामपंचायतीला अभीव्यक्ती स्वातंत्र हिरावून घेण्याचा अधीकार नाही तसेच संबंधीत ठराव घेणाऱ्या ग्रामसेवक, संरपंच , ग्रामपंचायत सदस्य यांच्याविरुद्ध कारवाई व्हायला हवी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते ऍड. सोमेश्वर कारके व सत्यभामा सौंदरमल यांनी केली आहे.
दि २५ डिंसेबर रोजी गेवराई पोलीस ठाण्यात आपल्याला या महिलेने जातिवाचक शिवीगाळ केली म्हणून गावातीलच एका व्यक्तीने फिर्याद दिली, त्यावरून सदर महिले विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातच सदर महिला वारंवार गावकऱ्यांना गुन्हे दाखल करण्याची धमकी देते म्हणून सदर महिलेवर कारवाई करावी अशी मागणी करणारे निवेदन पाचेगावच्या ग्रामस्थांनी दिले होते. यावेळी गावातील महिलांचीही उपस्थिती होती.