आपला जिल्हा
बीड जिल्ह्यातील “‘या” गावाने 30 वर्षांपासून राखली आहे बिनविरोध निवडणुकीची परंपरा कायम……!

बीड दि.6 – ग्रामपंचायत निवडणुकीचा धुरळा उडत आहे. कुठे चुलत्या पुतण्यात तर कुठे भावा भावात काट्याची टक्कर दिसत आहे. एवढेच काय तर अण्णा हजारे आणि पोपटराव पवार यांच्या गावात सुद्धा निवडणूक बिनविरोध होऊ शकलेली नाही. मात्र असे असले तरी बीड जिल्ह्यातील एक गाव मागच्या 30 वर्षांपासून बिनविरोध ची किमया करत आहे.
गावागावात सरपंच कोण? याचीच चर्चा रंगू लागलेली आहे. मात्र बीड शहरापासून पंधरा किलोमीटर अंतरावर असलेल्या वंजारवाडी या गावची ग्रामपंचायत निवडणूक 30 वर्षापासून बिनविरोध केली जात आहे. एकूण नऊ सदस्य असलेली वंजारवाडी ग्रामपंचायत आहे. गावची लोकसंख्या 3 हजार आहे. प्रत्यक्ष मतदान सोळाशे ते सतराशे एवढे आहे. 30 वर्षांपूर्वी बीड जिल्ह्यातील इतर गावांप्रमाणे या गावात देखील निवडणुका होत असत. साहजिकच निवडणुका म्हटले की, एक दुसऱ्याच्या विरोधात द्वेष निर्माण होत असे. यातून गावात सतत तंटे निर्माण व्हायचे. मात्र, 30 वर्षापूर्वी सर्व गाव एकत्र जमले व ग्रामपंचायत निवडणुक बिनविरोध करण्यावर विचार करू लागले. गावातील नागरिक वैजनाथ तांदळे यांनी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रस्ताव गावकऱ्यां समोर ठेवला. गावच्या विकासावर सर्व बाजूंनी चर्चा केली. गावकऱ्यांना त्यांचे म्हणणे पटले व 30 वर्षांपूर्वी एकमताने ग्रामपंचायत बिनविरोध करण्याचा निर्णय वंजारवाडीच्या ग्रामस्थांनी घेतला. तेव्हापासून आतापर्यंत या गावात ग्रामपंचायत निवडणुका झाल्या नाहीत. याचा परिणाम गावातील विकास जलद गतीने होऊ लागला. एवढेच नाही तर गावात खेळीमेळीचे वातावरण देखील निर्माण झाले. यंदादेखील निवडणुकांना फाटा देत व गावातील संघर्ष टाळत गावकऱ्यांनी बिनविरोध नऊ ग्रामपंचायत सदस्यांची निवड केली आहे.