केज तालुक्यातील ढाकेफळ येथील बबन भागवत काळे ( वय २८ ) यांची पत्नी रेखा काळे यांचे सोनीजवळा हे माहेर आहे. मागील काही दिवसांपूर्वी रेखा ही माहेरी आली होती. त्यामुळे पत्नीला आणण्यासाठी बबन काळे हा आईवडीलांसह पाच जानेवारी रोजी दुपारी चार वाजता सासुरवाडीला गेला. त्यांचे सासरे आणि सोनीजवळा गावचे पोलीस पाटील असलेले राजाराम बन्सी पवार, मेव्हूणे जयसिंग राजाराम पवार, राहुल राजाराम पवार, चुलत सासरे दादा बन्सी काळे या चौघांनी भांडणाची कुरापत काढून जावई बबन काळे यांना काठीने बेदम मारहाण केली. या मारहाणीत हाताच्या बोटावर आणि कोपऱ्यावर काठी बसल्याने ते जखमी झाले. तर त्यांचे आईवडील हे भांडण सोडविण्यासाठी आले असता त्यांना ही शिवीगाळ करीत लाथाबुक्याने मारहाण केली. शिवाय त्यांनी जीवे मारण्याची धमकी दिली. बबन काळे यांच्या फिर्यादीवरून पोलीस पाटील सासरे राजाराम पवार यांच्यासह जयसिंग पवार, राहुल पवार, दादा काळे या चौघाविरुद्ध युसुफवडगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस नाईक परमेश्वर शिंदे हे पुढील तपास करत आहेत.