साडेपाच हजार कोंबड्यांचे होणार “कलिंग”……! कसं केलं जातं कलिंग….?
परभणी दि.१३ – जिल्ह्यातील मुरुंबा गावात 800 कोंबड्यांचा अचानक मृत्यू झाल्यानंतर स्थानिक प्रशासनाने मृत कोंबड्यांचे नमुने भोपाळच्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले होते. त्यात या कोंबड्यांचा मृत्यू ‘बर्ड फ्लू’नेच झाल्याचं निदान करण्यात आलं.हा अहवाल येताच प्रशासनानं तातडीच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत. खबरदारी म्हणून मुरुंबा गावच्या एक किलोमीटर परिसरातील हजारो कोंबड्या नष्ट करण्यात येणार आहेत. जेसीबीने खड्डा खणून त्यात या कोंबड्या पुरण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान गावाच्या 10 किमी परिसराला प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलं आहे. यामुळे या परिसरात कोंबड्या किंवा अंडी यांची ने-आण करण्यास मनाई असेल असं जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी सांगितलं आहे. मुरुंबा गावात बर्ड फ्लूनं शिरकाव केल्यानं हे गाव संसर्गित म्हणून घोषित करण्यात आलं आहे. इथल्या कोंबड्यांचं सर्व्हेक्षण करण्यात येणार असून कोंबड्या, अंड्यांची वाहतूक आणि खरेदी-विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे.प्रिव्हेंशन अँड कंट्रोल ऑफ कंटेजिअस डिसिज इन अॅनिमल अॅक्ट 2009 नुसार पुढील कारवाई करण्यात येणार आहे. जोपर्यंत हा परिसर संसर्गमुक्त घोषित केला जात नाही तोपर्यंत खबरदारीचे उपाय पाळण्यात येतील.
काय आहे कलिंग प्रक्रिया……?
संसर्ग झालेले पाळीव पक्षी जसे की कोंबड्या किंवा बदक यांना सामूहिकरीत्या नष्ट करणे. त्याचबरोबर जे निरुपयोगी पक्षी आहेत त्यांना देखील विविध प्रकारे नष्ट केलं जातं.केवळ अंडी उत्पादनासाठी असलेल्या पोल्ट्री फार्ममध्ये नर जातीच्या कोंबडीच्या पिल्लांना सुरुवातीलाच नष्ट केलं जातं. परभणी जिल्ह्यात जे कलिंग होणार आहे ते पक्ष्यांचं मान मुरगळून केलं जाणार आहे. कोंबड्यांच्या माना मुरगुळून त्यांची तत्काळ हत्या करण्यात येणार आहे आणि नंतर त्यांना मोठा खड्डा खणून त्यात पुरलं जाईल. यामुळे इतर पक्ष्यांना संसर्ग होण्याची शक्यता कमी होते. मुरुंबा येथे बर्ड फ्लूमुळे पक्षी मेल्यानंतर या गावाच्या एक किमी परिसरातील कोंबड्यांचं कलिंग केलं जाणार आहे.