धनंजय मुंडेंवर गुन्हा दाखल करण्यासाठी हेमंत पाटील उच्च न्यायालयात……!

मुंबई दि.१६ – राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी निवडणूक प्रक्रियेची फसवणूक केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात यावा, अशी मागणी करणारी याचिका पुण्याचे आरटीआय कार्यकर्ते हेमंत पाटील यांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे. धनंजय मुंडे यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात त्यांना आणखी दोन मुले असल्याचे नमूद न करून फसवणूक केली आहे. त्यामुळे त्यांच्यावर भारतीय दंडसंहिता कलम 420 अंतर्गत गुन्हा नोंदवावा, अशी मागणी पाटील यांनी याचिकेत केली आहे.
मुंडे यांनी आयपीसी 420 अंतर्गत गुन्हा केला आहे. मी परळी येथील संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी गुन्हा नोंदवला नाही. पोलीस महा संचालक आणि मुख्य निवडणूक आयुक्तांनीही मी नोंदविलेल्या तक्रारीची दखल घेतली नाही. त्यामुळे ही याचिका दाखल केली आहे, असं पाटील यांनी याचिकेत म्हटलं आहे.
दरम्यान, हेमंत पाटील यांनी दाखल केलेल्या याचिकेवर पुढील आठवड्यात सुनावणी होण्याची शक्यता आहे.