आरोग्य व शिक्षण
5 वी ते 8 वी चे वर्ग सुरू होण्यापूर्वी होणार शिक्षकांची कोरोना टेस्ट…..!
मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांच्या सूचना......!
बीड दि.20 – नोव्हेंबरमध्ये 9 वी ते 12 पर्यंतचे वर्ग सुरू करण्याच्या अगोदर संबंधित वर्गांना शिकवणाऱ्या शिक्षकांची कोरोना टेस्ट करण्यात आली होती. त्याच अनुषंगाने आता 5 वी ते 8 वीचे वर्ग सुरू करण्याच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा संबंधित वर्गांना शिकवणाऱ्या शिक्षकांना (आरटीपीसीआर) टेस्ट करू घ्यावी लागणार आहे.
जस जसा कोरोनाचा प्रकोप कमी होऊ लागला आहे तश्या सर्व गोष्टी पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. शैक्षणिक बाबतीत मागच्या अनेक महिन्यांपासून बंद असलेल्या शाळा व महाविद्यालये सुरू करताना सुरुवातीला नियम व अटी घालून 9 वी ते 12 वी चे वर्ग सुरू केले. सदरील वर्ग सध्या तीन तासांसाठी सुरू आहेत. त्यावेळेस वर्ग सुरू करण्या भागीदार संबंधित वर्गांना शिकवणाऱ्या शिक्षकांची व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली होती.
दरम्यान जिल्ह्यात अनेक शाळा पाचवी ते बारावी पर्यंतचे वर्ग असणाऱ्या आहेत. त्यामध्ये बहुतांश शिक्षक हे पाचवीपासून दहावीपर्यंत अध्यापन करतात. त्यामुळे मागच्या दोन महिन्यांपूर्वी पाचवी ते बारावी पर्यंतच्या शाळेतील सर्वच कर्मचाऱ्यांनी कोरोना टेस्ट करून घेतली होती. मात्र आता 5 ते 8 वी चे वर्ग सुरू करण्यात येणार आहेत आणि जे या सर्व वर्गांना शिकवतात त्या सर्व शिक्षकांना तीन महिन्यांच्या आत पुन्हा कोरोना टेस्ट करून घ्यावी लागणार का ? हा प्रश्न आहे.
पाचवी ते आठवी पर्यंत चे वर्ग सुरू करतानाही कोरोनाचे सर्व नियम पाळणे बंधनकारक असणार आहे. यामध्ये पालकांचे संमतीपत्र, सोशेल डिस्टनसिंग, एक दिवसाआड 50% विद्यार्थी उपस्थित ठेवणे इत्यादी बाबी काटेकोरपणे पाळाव्या लागणार आहेत. तसेच परिपाठ, स्नेहसंमेलन यांसारखे गर्दी होणारे कार्यक्रम आयोजित करण्यावर निर्बंध आहेत. विद्यार्थी उपस्थितीची अट नसल्याने ऑनलाईन शिक्षण सुरूच राहणार आहे.
दरम्यान शिक्षकांच्या कोरोना टेस्ट चे वेळापत्रक गटशिक्षणाधिकारी यांनी तयार करून तालुका आरोग्य अधिकारी यांच्याकडे देऊन टेस्ट करून घेण्याच्या व शाळा सुरू करण्याच्या मार्गदर्शक सूचना बीड जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी निर्गमित केल्या आहेत.