केज दि.२२ – भरधाव वेगात आलेल्या अज्ञात वाहनाने समोर चालत असलेल्या दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिल्याने या अपघातात दुचाकीवरील ५० वर्षीय महिला जागीच ठार झाली. हा अपघात केज – अंबाजोगाई राष्ट्रीय महामार्गावरील चंदनसावरगाव येथील बसस्थानकाजवळ घडली.
केज तालुक्यातील शिरपुरा येथील वसंत लक्ष्मण घुले ( वय ५५ ) व त्यांची पत्नी चंद्रकला वसंत घुले ( वय ५० ) हे दोघे दुचाकीवरून ( एम. एच. ४४ एम. १९६८ ) लाडेवडगाव येथून होळमार्गे गावाकडे निघाले होते. ते अंबाजोगाई रस्त्याने केजकडे येत असताना चंदनसावरगाव येथील बसस्थानकाजवळ अंबाजोगाईकडून केजकडे भरधाव वेगात जाणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील चंद्रकला वसंत घुले ( वय ५० ) ही महिला जागीच ठार झाली. दुचाकीला धडक देत वाहन चालक हा वाहनासह फरार झाला. ही घटना २० जानेवारी सकाळी ७ वाजता घडली. वसंत लक्ष्मण घुले यांच्या फिर्यादीवरून अज्ञात वाहन चालकाविरुद्ध युसुफवडगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक फौजदार भागवत कांदे हे पुढील तपास करीत आहेत.