शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय…..!
मुंबई दि.27 – कृषीपंप वीजजोडणी धोरणाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवण्यासाठी सरकारने धाडसी पाऊल उचलले आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केले. कृषीपंप वीजजोडणी धोरण-2020 चे लोकार्पण वर्षा येथील समिती कक्षात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज पार पडले, त्यावेळी ते बोलत होते. दरम्यान, राज्यातील वीजचोरीचे वास्तव लक्षात घेऊन सुमारे 4.85 लाख अनधिकृत कृषीपंप वीज जोडण्या अधिकृत करण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे.
राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे असल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, शेतकरी कर्जमाफीनंतर आता कृषीपंप वीजजोडणी धोरणाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना तातडीने वीजजोडणी देणे, वीजबिलातील थकबाकीवरील व्याज व विलंब शुल्कात सवलत देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. या माध्यमातून सवलतीनंतर पहिल्या वर्षी उर्वरित 50 टक्के थकबाकी भरल्यास राहीलेली बिलाची रक्कम माफ होणार आहे. शेतकऱ्यांना आपल्या पायावर उभे करण्यासाठी राज्य शासनाकडून सुरु असलेल्या प्रयत्नांना प्रतिसाद द्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील शेतकऱ्यांना केले.