क्राइम
केजमधील घरफोडी, दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस : चार दुचाकी, १३ मोबाईल हस्तगत ; चोरट्यास पोलीस कोठडी
केज दि.३० – स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केज शहरातून जुबेर उर्फ पाप्या मुस्ताक फारोकी या चोरट्यास ताब्यात घेतले आहे. त्याने एका घरफोडीसह चार दुचाकीची चोरी केल्याचे कबूल केले असून त्याच्याकडून चार दुचाकी व १३ मोबाईल पोलिसांनी हस्तगत केले आहेत. त्याला १ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
केज पोलिस ठाण्याच्या हद्दीत मागील दोन ते तीन महिन्यापासूूून घरफोडी आणि दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात वाढ झाली असून हे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पोलीस अधीक्षकांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षकांना गुन्हेगार निष्पन्न करुन गुन्हे उघडकीस आणणेबाबत सक्त सुचना दिल्या होत्या. त्यानुसार स्थागुशाच्या अधिकारी व अंमलदार यांनी गुन्हे उघडकीस आणण्यासाठी वेगवेगळे पथके तयार करुन रवाना केली होती. त्यापैकी एक पथक केज शहरात गुन्हेगारांचा शोध घेत असताना त्यांना गुप्त बातमीदाराकडून जुबेर उर्फ पाप्या मुस्ताक फारोकी ( रा. रोजामोहल्ला, केज ) याने व त्याचे साथीदारानेे शहरातील नेहरुनगर भागात केलेल्या घरफोडीतील चोरलेले मोबाईल त्याचे जवळ असल्याची व तो सध्या त्याचे राहते घरी असल्याची माहिती मिळाली. त्यावरुन पथकाने सापळा लावून जुबेर उर्फ पाप्या फारोकी यास ताब्यात घेतले. त्याच्याजवळ मिळून आलेल्या मोबाईल व नगदी पैशाबाबत विचारपुस केली असता त्याने उडवाउडवीचे उत्तरे दिली. मात्र त्याला पोलीसी खाक्या दाखवताच त्याने व त्याचा साथीदाराने मिळून नेहरुनगर येथील फेरोज शेख यांचे घरी चोरी केल्याची कबुली देवून त्या चोरीतील मोबाईल व पैसे असल्याचे सांगीतले. तर केज शहरात व बसस्थानकातून आणखी मोबाईल चोरलेले असून फुलेनगर, वसंत विद्यालयातून दुचाकी चोरल्याचे ही कबुल केले. त्याच्याकडून चोरलेले १५ मोबाईल व चार दुचाकी हस्तगत करून त्याला चोरीच्या गुन्ह्याच्या तपासासाठी केज पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. जुबेर फारोकी याला शनिवारी केज येथील न्यायालयासमोर हजर केले असता त्यास १ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
दरम्यान, केज व परिसरातून ज्यांचे मोबाईल चोरीस गेलेले असतील, त्यांनी केज पोलीस ठाण्यात जावून खात्री करावी. तर या गुन्ह्यातील चोरी केलेला मुद्येमाल व इतर आरोपीचा शोध स्थानिक गुन्हे शाखेचे पथक करीत आहे.