#Accident
परभणीहून वसमतकडे जाणार्या कारचे टायर फुटल्याने कार नदी पात्रात कोसळली…!
परभणी दि.30 – परभणी-वसमत मार्गावरील राहाटी पुलावरून भरधाव वेगाने जाणार्या कारचे टायर अचानक फुटल्याने कार रहाटी पुलावरून नदीत कोसळल्याची भयंकर घटना शनिवार दि.३० जानेवारी २०२१ रोजी मध्यरात्री एक ते दिड वाजेच्या सुमारास घडली. कारमधील चालकासह अन्य एक व्यक्ती प्रसंगावधान राखून बाहेर पडल्याने बालंबाल बचावल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.
शनिवारी सकाळी दहाच्या सुमारास पाण्यात गेलेली कार (एमएच ४९ बी ८८४६) ही परिसरातील ग्रामस्थ व भोई समाजातील नागरिकांच्या मदतीने नदीपात्रातून बाहेर काढण्यात आली. परभणीहून वसमतकडे दोघे जण एका कारने शनिवारी मध्यरात्री एकच्या सुमारास वसमतकडे निघाले होते. रहाटीनदीच्या पुलाजवळ भरधाव कार येत असतानाच कारचे टायर फुटले. यामुळे चालकाचा कारवरील ताबा सुटला व ती कार पुलालगतच्या कच्या रस्त्यावरून थेट पाण्यात गेली.
मध्यरात्रीनंतर घडलेल्या या घटनेमुळे परिसरातील शेतातील व पुलाचे काम करणारे काही जण तातडीने मदतीसाठी धावले. कारमधील चालकासह अन्य एक व्यक्ती तातडीने बाहेर पडल्याने ते बालंबाल बचावल्याचे प्रत्यक्षदर्शींनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले. रहाटीनदीस पाणी भरपूर असल्याने ती कार पूर्णपणे पाण्यात गेली होती.
दरम्यान मागच्या आठ दिवसांपूर्वीच केज येथील शिक्षक सारंग काळे व त्यांचे नातेवाईक औंढ्यावरून नांदेड ला जाताना पूर्णा नदीपात्रात कार कोसळून झालेल्या अपघातात सारंग काळे यांना आपला जीव गमवावा लागला.