#Social

जागतिक पुस्तक दिनानिमित्त झाडांना बांधले पुस्तकांचे तोरण…..!

6 / 100 SEO Score

नांदेड – पुस्तक हे मस्तक घडविण्याचे कार्य करीत असते. वाचनाने विचारांच्या कक्षा रुंदावत असतात. समाजात वाचन संस्कृतीचा परिपोष होण्यासाठी विविध उपक्रम राबविले जातात. शालेय पातळीवर गोष्टींचा वार शनिवार, वाचन प्रेरणा दिवस, खाऊ प्रकल्प, लेखन वाचन हमी कार्यक्रम, वाचनालय शाळेच्या दारी, दप्तराविना शाळा असे विविध उपक्रम राबविले जातात. या उपक्रमांचे उद्देश वेगवेगळे असले तरीही वाचक निर्माण करणे हा एक समन्वित उद्दिष्ट आहे. २३ एप्रिल जागतिक पुस्तक दिनाच्या औचित्याने झाडांनाच पुस्तकांचे तोरण बांधून वृक्षराजींच्या सानिध्यात मुक्त बालवाचनालय उपक्रमास प्रारंभ करण्यात आला. जवळा जि.प. शाळेच्या शिक्षकांनी परीक्षा संपल्या नसल्या तरी दररोज पेपर झाल्यावर एक तासाचा अनोखा उपक्रम सुरू केला असल्याने सर्वच स्तरातून कौतुक करण्यात येत आहे. परीक्षा संपल्यावर नियमितपणे हा उपक्रम सुरू राहणार असल्याचे मुख्याध्यापक गंगाधर ढवळे यांनी सांगितले.

टीव्ही, मोबाईल, आॅनलाईन गेम च्या जमान्यात वाचकही अदृश्य होत चालला आहे आणि वाचनाची आवडही कमी होत चालली आहे. वाचनाचे महत्व हे अत्यंत मोठे आहे. वाचनामुळे ज्ञान वाढते. वाचनाचे फायदे जर आपण पाहिले तर वाचनामुळे आपल्याला नवीन गोष्टी आणि कल्पना शिकायला मिळतात. जर नियमित वाचन असेल तर आपले भाषा कौशल्य सुधारून आपले व्यक्तिमत्व सुधारते. वाचनाने एकाग्रता वाढवते आणि तणाव कमी होतो. विविध प्रकारच्या कथा, लेख आणि पुस्तके वाचून आपण छानपैकी प्रगल्भ होऊ शकतो यासाठीच आपल्याला नियमितपणे वाचनाची सवय लावायला पाहिजे. विद्यार्थ्यांना सुट्टया एक मे पासून असल्या तरी पुढील शैक्षणिक वर्षासाठी शाळा सुरू होण्यापर्यंतच्या या कालावधीत वाचनाची आवड निर्माण व्हावी आणि वाचन संस्कृतीची रुजुवात शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांत व्हावी यासाठी जवळा देशमुख येथील शिक्षकांनी हा अनोखा उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. गतवर्षीही हा उपक्रम राबविण्यात आला होता. या उपक्रमास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. यावर्षी वाढत्या उष्णतेमुळे विद्यार्थ्यांची काळजी घेत जागतिक पुस्तक दिनापासून उपक्रमास प्रारंभ करण्यात आला आहे.

शालेय परिसरातील वृक्षराजींच्या सान्निध्यात मुख्याध्यापक गंगाधर ढवळे, उमाकांत बेंबडे, सहशिक्षक संतोष घटकार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किशनराव गच्चे, सदस्य आनंद गोडबोले, मारोती चक्रधर, हैदर शेख, माता पालक संघाच्या अध्यक्षा मनिषा गच्चे यांच्या सहकार्याने मुक्त वाचनालय हा दोन तासांचा अनोखा उपक्रम राबविण्यात येत आहे. जवळा देशमुख येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील प्रांगणात झाडांना दोरी बांधून त्यास गोष्टींची, शूरविरांची, थोर महापुरुषांची चरित्रे, वैज्ञानिकांची पुस्तके आदी विविध प्रकारची पुस्तके डकविण्यात येतात. अशी दहा तोरणे बांधण्यात आली आहेत.

विद्यार्थी झाडांच्या थंड सावलीत बसून सकाळच्या सत्रात सुरू असलेल्या उपक्रमात सहभागी होत कोणतेही आवडीचे पुस्तक घेऊन वाचत बसतात. तसेच वाचन झाल्यावर ते परत ठेवून देतात. ही प्रक्रिया सतत दीड ते दोन तास आणि दोन सत्रात चालते, असे या उपक्रमाचे स्वरूप असून शाळेतील विद्यार्थ्यांसह इतर विद्यार्थीही यात सहभागी होत आहेत. या उपक्रमाचे स्वागत केंद्रप्रमुख संतोष अंबुलगेकर, केंद्रीय मुख्याध्यापक आनंदा नरवाडे, शिक्षणविस्तार अधिकारी सरस्वती आंबलवाड, गटशिक्षणाधिकारी सतीश व्यवहारे, माजी सरपंच कमलताई शिखरे, साहेबराव शिखरे, कैलास गोडबोले आदींनी केले आहे.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close