सुसाईड नोट लिहून अन आत्महत्या करणार म्हणत असलेला व्हिडिओ करून महाराज बेपत्ता…….! गेवराई तालुक्यातील धक्कादायक प्रकार……!
गेवराई दि. 8 – तालुक्यातील कोळगांवयेथील सुर्यमंदिर संस्थानच्या मठाधिपतीवर एका 14 वर्षीय विद्यार्थीनीचा विनयभंग केल्याप्रकरणी चकलांबा पोलीस ठाण्यात हनुमान महाराजांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर या महाराजांनी (दि.7) सकाळी सुसाईड नोट लिहून सोशल मीडियावर आपण आत्महत्या करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल केला. यानंतर हे महाराज संपूर्ण दिवस बेपत्ता असल्याने खळबळ उडाली. चकलांबा पोलीस या प्रकरणाचा तपास करीत असून रात्री उशीरापर्यंत महाराजांचा ठावठिकाणा लागला नव्हता.
31 जानेवारी रोजी हनुमान महाराज यांनी एका 14 वर्षीय विद्यार्थीनीचा विनयभंग केला असल्याची तक्रार चकलांबा पोलीस ठाण्यात नोंदविली होती. त्यानंतर महाराजांवर विनयभंग आणि अॅट्रॉसिटी कायद्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. रविवारी महाराजांनी फेसबुक लाईव्ह करत आपल्याला बदनाम करण्यासाठी कटकारस्थाने रचली जात आहेत. मला बदनाम करण्याच्या हेतूने हा सर्व प्रकार सुरु आहे. माझा कुठलाही दोष नसताना माझ्यावर हे आरोप करण्यात आले. यामुळे आता मला जगण्याची इच्छा नसून मी आत्महत्या करीत आहे. त्यामुळे माझ्या आत्महत्येस प्रवृत्त असणार्याविरोधात गुन्हा दाखल करावा असे त्यांनी म्हटले आहे. फेसबुकवरही त्यांनी व्हिडीओ व्हायरल केला होता. रविवारी दिवसभर या व्हिडीओची मोठी चर्चा झाली. रात्री उशीरापर्यंत महाराजांचा ठावठिकाणा लागला नव्हता. दरम्यान चकलांबा पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहे.
दरम्यान रविवारी रात्री उशीरा 10 च्या सुमारास चौसाळा येथे विविध अफवांना पेव फुटले होते. या परिसरात महाराजांनी आत्महत्या केली असल्याची अफवा होती मात्र याला पोलीस प्रशासनाकडून दुजोरा मिळाला नाही. चकलांबा आणि चौसाळा पोलीस रात्री उशीरापर्यंत महाराजांचा ठावठिकाणा घेत होते.