आग लावली प्रेयसीला, जीव मात्र गेला स्वतःचाच………!

मुंबई दि.८ – प्रेयसीला जिवंत जाळण्यासाठी गेलेल्या प्रियकराचाच आगीत भाजून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मुंबईतील जोगेश्वरी भागात हा धक्कादायक प्रकार घडला. या घटनेत गंभीर जखमी झालेली प्रेयसी रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे.
जोगेश्वरी पूर्व मेघवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी रात्री ही घटना घडली. मयत तरुण आणि प्रेयसी या दोघांचे जवळपास अडीच वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र दोघांमध्ये काही काळापासून खटके उडत होते. तर दारुच्या सवयीमुळे विजय वारंवार तरुणीचा छळ करत होता. कंटाळून प्रेयसीने विजयशी प्रेमसंबंध ठेवण्यास आणि त्याच्याशी लग्न करण्यासही नकार दिला होता. त्यामुळे संतापाच्या भरात विजयने टोकाचे पाऊल उचलल्याचं बोलल्या जात आहे.
दरम्यान प्रेयसीला जिवंत जाळण्यासाठी विजय पेट्रोल घेऊन गेला. मेघवाडी परिसरात त्याने तिच्यावर पेट्रोलही टाकले. मात्र तिने त्याला मिठी मारली. त्यामुळे तरुणीसोबत विजयही पेटला. अखेर आगीत होरपळून विजयचा मृत्यू झाला. तर प्रेयसी मुंबईतील जेजे हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देत आहे.