ब्रेकिंग

माहिती व जनसंपर्क सचिवांच्या वाढदिवसाने सुरु झाली गडचिरोलीत चिमणपाखरांची शाळा…..!

बीड दि. ७ –  गडचिरोली जिल्हयासारख्या भागात जावून आदिवासी विद्यार्थ्यांसोबत जन्मदिवस साजरा करण्याची आंतरिक इच्छा आज पूर्ण झाली आहे. धानोरा येथील कस्तूरबा गांधी बालिका विद्यालयात आज झालेला जन्मदिनाचा कार्यक्रम माझ्यासाठी अविस्मरणीय असून कोरोना नंतरच्या शाळेच्या सत्राला आजच्या कार्यक्रमाने सुरुवात होत आहे याचा आनंद आहे. दुर्गम भागात ऊन, वारा, पाऊस तसेच  कोरोना न बघता विद्यादान येथील शिक्षकांनी सुरू ठेवल्याचे मला मनस्वी समाधान असल्याचे गौरवोद्गार राज्याचे माहिती व जनसंपर्क महासंचालक तथा सचिव डॉ.दिलीप पांढरपट्टे यांनी केले.
   माहिती व जनसंपर्क विभागाच्या अधीनस्त असलेल्या कार्यालयांच्या आढाव्यासाठी विदर्भ दौऱ्यावर आलेल्या  महासंचालक डॉ. पांढरपट्टे यांनी आज गडचिरोली येथे नागपूर विभागातील  जिल्हा माहिती अधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीला नागपूर -अमरावती विभागाचे संचालक हेमराज बागूल यांच्यासह जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते, प्रवीण टाके, मनीषा सावळे, सचिन अडसूळ, अनिल गडेकर उपस्थित होते. आज त्यांचा जन्मदिवस होता. त्यानिमित्ताने त्यांनी  दुपारच्या सत्रात  धानोरा येथील आदिवासी मुलींच्या कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयास भेट दिली. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
डॉ. पांढरपट्टे यांनी यापूर्वी जिल्हाधिकारी म्हणून धुळे आणि सिंधुदुर्ग येथे कार्य केले आहे. सव्यसाची लेखक, जाणिवेचे सनदी अधिकारी यासोबतच एक प्रथितयश गझलकार म्हणून ते ख्यातीप्राप्त आहेत. यंदाचा आपला जन्मदिन त्यांनी  गडचिरोली जिल्ह्यातीलआदिवासी पाड्यांमध्ये साजरा करण्याचे ठरविले होते. त्यानुसार हा उपक्रम पार पडला.
            शासनाने  2008 पासून दहा ते चौदा वयोगटातील  शाळेत न गेलेल्या व मधून शाळा सोडलेल्या मुलींकरिता त्यांचे किमान इयत्ता आठवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण करण्याकरिता कस्तुरबा गांधी बालिका निवासी विद्यालयाची सुरुवात केली आहे. ही शाळा निवासी असून या ठिकाणी, महिला साक्षरता कमी असणाऱ्या परिसरात, आदिवासी समुदायातील शाळाबाह्य विद्यार्थिनींना शिक्षण देण्यात येते. महाराष्ट्रात अशा ४६ शाळा असून गडचिरोली जिल्ह्यामध्ये पाच ठिकाणी या शाळा सुरू आहेत. यातील शंभर टक्के निकाल देणाऱ्या व अनेक निराश्रितांच्या आयुष्याचा कायापालट करणाऱ्या धानोरा येथील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात वाढदिवसाचा हा एक अनोखा भावनिक सोहळा आयोजित करण्यात आला. यावेळी शाळेतील मुलींनी पारंपारिक रेला नृत्य करीत त्यांचे स्वागत केले. डॉ. पांढरपट्टे यांनी सर्व मुलींना यावेळी शैक्षणिक साहित्य भेट दिले.
     मुलींशी संवाद साधताना ते म्हणाले, गडचिरोलीसारख्या भागात शिक्षण घेताय म्हणून न्यूनगंड बाळगू नये. तुम्ही यापूर्वीच आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. तुम्ही गुणवान आहात. त्यामुळेच ही शाळा कायम १०० टक्के निकाल देत आहे. अनेकांनी यशस्वीपणे उद्योग व व्यवसायात नाम कमावले आहे. वनांनी आच्छादित अशा निसर्गरम्य परिसरात राहूनही आदिवासी बांधव जगाच्या पुढे आहेत. येथील शैक्षणिक वातावरण व विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेने ते सिद्ध झाले आहे. यापुढेही खूप शिका आणि मोठं व्हा, असे आवाहनही त्यांनी यावेळी विद्यार्थिनींना केले.
 नागपूर व अमरावती विभागाचे संचालक हेमराज बागूल, शिक्षणाधिकारी राजकुमार निकम, लेखा मेंढयाच्या सरपंच नंदा दुगा यांनी  महासंचालक डॉ. पांढरपट्टे यांनी अति दुर्गम आदिवासी भागात भेट देवून वाढदिवस साजरा करण्याच्या संकल्पनेचे कौतुक केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याद्यापिका दिपाली कुळमेथे यांनी केले. त्यांनी शाळेच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. कार्यक्रमाचे संचलन शिक्षिका कीर्ती फुंडे यांनी केले तर आभार शिक्षिका श्रीमती कुथे यांनी मानले.
            तत्पूर्वी त्यांनी ‘आमच्या गावात आम्हीच सरकार’ या संकल्पनेवर आधारित असलेल्या लेखा मेंढा या गावाला भेट देवून ग्रामविकासाच्या विविध उपक्रमांची माहिती घेतली. यावेळी लेखा मेंढाच्या सरपंच नंदा दुगा यांनी गावाविषयीच्या कामकाजाची व ग्रामसभेबद्दलची माहिती दिली. लेंखा मेंढा गावात झालेल्या कार्यक्रमाला सरपंचांसह ग्रामसभेचे अध्यक्ष अलीराम हिचामी, ग्रामसभा सचिव चरणदास तोफा, नरेश कुमोटी, मनिराम दुगा, आकांक्षित जिल्हा फेलो सुधाकार गवंडगावे व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close