ग्लोबल टिचर पुरस्कार विजेते डिसले गुरुजी घेणार सर्व जिल्ह्यांमध्ये ‘शिक्षक प्रेरणा कार्यशाळा’…….!
मुंबई दि.११ – ग्लोबल टिचर पुरस्कार विजेते शिक्षक रणजितसिंह डिसले यांच्या माध्यमातून राज्यात आता सर्व जिल्ह्यांमध्ये ‘शिक्षक प्रेरणा कार्यशाळा’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. डिसले यांच्या कार्यातून सर्व शिक्षकांना प्रेरणा मिळावी तसेच शिक्षणातील आधुनिक तंत्रज्ञानाचा सर्वांना परिचय व्हावा यासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये जाऊन डिसले या कार्यशाळांमध्ये मार्गदर्शन करणार आहेत. अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.
सोलापूर जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षक रणजितसिंह डिसले यांना ग्लोबल टिचर पुरस्कार मिळाला आहे. श्री. डिसले हे व्हर्च्युअल फिल्ड ट्रिप या आगळ्या वेगळ्या शैक्षणिक उपक्रमाच्या माध्यमातून जगभरातील १४३ हून अधिक देशातील १४०० पेक्षा जास्त शाळांतील मुलांना शिकविण्याचे काम करीत आहेत. राज्यातील इतर शिक्षकांनाही श्री. डिसले यांच्या कामाची ओळख व्हावी, तसेच शिक्षकांना प्रेरणा मिळावी यासाठी ‘शिक्षक प्रेरणा कार्यशाळा’ हा उपक्रम सुरु करण्याचे शासनाने ठरविले आहे.
दरम्यान राज्यातील सर्व जिल्हा परिषदांनी या उपक्रमामधून आपल्या जिल्ह्याचा कार्यक्रम निश्चित करावा, अशा सूचना सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आल्या आहेत. तसेच जिल्हा परिषद शाळांतील शिक्षकांना डिसले यांनी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अधिक प्रभावी शिक्षण देण्याबाबत मार्गदर्शन करावे व शिक्षकांनी नवनवीन उपक्रम राबवावेत, असे आवाहन मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले आहे.