एकाच वसतिगृहातील 75 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण…….! वसतिगृह सुरू करण्यावर प्रश्नचिन्ह…….!
वर्धा दि.१२ – हिंगणघाट येथील निवासी वसतिगृहात 75 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे येथे खळबळ उडाली आहे. सातेफळ मार्गावर असलेल्या एका खासगी संस्थेच्या निवासी वसतिगृहातील एका विद्यार्थ्याला चार दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यांनतर येथे तब्बल 75 विद्यार्थ्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. या प्रकारामुळे शासकीय तसेच खासगी वसतीगृह सुरु करण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
हिंगणघाट शहराच्या सातेफळमधील एका खासगी संस्थेचे निवासी वसतिगृह आहे. या वसतिगृहातील एका विद्यार्थ्याला 4 दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. या विद्यार्थ्यांवर शहरातील एका खाजगी डॉक्टरकडून उपचार सुरू होते. दरम्यान विद्यार्थ्याला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट होताच संपर्कात आलेल्या विद्यार्थ्यांची चाचणी करण्यात आली. बुधवारी वसतिगृहातील 39 विद्यार्थ्यांची चाचणी करण्यात आली होती. त्यापैकी 30 विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह निघाले. तर गुरुवारी वसतिगृहातील 247 विद्यार्थी आणि 30 कर्मचाऱ्यांची अँटिजन टेस्ट करण्यात आली. या चाचणीमध्ये आणखी 45 विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले.
दरम्यान वसतिगृहात सर्व विद्यार्थी सोबतच राहत असतात. सोशल डिस्टन्सिगचे नियम तेवढ्या क्षमतेने पाळता येत नाहीत. त्यात वर्धा जिल्ह्यात एवढ्या मोठ्या संख्येने वसतिगृहतील विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे राज्यात खरंच सरकारी आणि खासगी संस्थांची वसतिगृहे सुरु करणे योग्य आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.