विदर्भ, मराठवाड्यात ”या” तारखे दरम्यान वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता……!
मुंबई दि.१४ – हवामानात दिवसेंदिवस चढउतार होत असल्याचं पहायला मिळत आहे. अवकाळी पाऊस ही तर एक मोठी समस्या बनली आहे. हवामानबदलाचा सर्वाधिक फटका हा शेतकऱ्यांना बसत असतो आणि आता याच शेतकरी राजासाठी चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. राज्याच्या काही भागांमध्ये पुढील काही दिवस अवकाळी पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.
१६ ते १८ फेब्रुवारी दरम्यान दुपारनंतर राज्याच्या काही भागात वादळी पाऊस कोसळण्याची शक्यता आहे तर काही भागात १९ फेब्रुवारीपर्यंत ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे. १६ तारखेला विदर्भातील भंडारा, गोंदिया, गडचिरोली, नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा आणि अमरावती या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. तर १७ तारखेला विदर्भासह मराठवाड्यात वादळी पावसाची शक्यता आहे, यावेळी गारपीट देखील होऊ शकते. यावेळी खान्देशसह पश्चिम महाराष्ट्रात मात्र पावसाची शक्यता नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. १८ तारखेला मात्र खान्देशसह नगर, नाशिक आणि पुण्याला पावसाचा अंदाज आहे. काही ठिकाणी गारपीटही होऊ शकते.
दरम्यान १८ तारखेला विदर्भात तसेच मराठवाड्यात पावसाचा प्रभाव कमी होईल. १९ तारखेला खान्देशसह पश्चिम महाराष्ट्रातही पावसाचा जोर नसेल फक्त ढगाळ हवामान राहील, २० तारखेपासून पुन्हा पूर्ववत होईल, अशी शक्यता आहे.