क्राइम
परळी तालुक्यातील घृणास्पद प्रकार; नराधमास घेतले ताब्यात……!
परळी दि.१६ – अवघ्या सात आणि आठ वर्षाच्या दोन चिमुकल्यांवर घराशेजारी रहाणाऱ्या २४ वर्षीय नराधमाने चाकूचा धाक दाखवत त्यांचे हातपाय बांधून अत्याचार केला. अतिशय किळसवाण्या आणि घृणास्पद पद्धतीने परळी तालुक्यात करण्यात आलेल्या या अत्याचाराला पंधरा दिवसानंतर वाचा फुटली आणि गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर फरार झालेल्या आरोपीला पोलिसांनी अवघ्या २४ तासात लातूर जिल्ह्यातील मुरुड येथून ताब्यात घेतले.
विकास नारायण कांदे (वय २४) असे त्या आरोपी तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पिडीत बालिकेच्या वडिलांच्या फिर्यादीनुसार त्यांची आठ वर्षीय मुलगी आणि सात वर्षीय भाची या दोघी पंधरा दिवसापूर्वी विकास कांदे याच्या घरी ताक आणण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी विकासच्या घरात कोणीही नव्हते. याचा गैरफायदा घेत विकासने त्या दोघींना एका खोलीत नेले. दोघींच्या गळ्याला भाजी कापण्याचा चाकू लावून त्याने त्यांचे हातपाय बांधले आणि कुकर्म केले. त्यानंतर त्याने झालेल्या प्रकाराबाबत कोणाला माहिती सांगितल्यास मारून जंगलात फेकून देईन अशा धमक्या दिल्या. त्यामुळे घाबरलेल्या पीडित मुलींनी मौन बाळगले. अखेर रविवारी (दि.१४) त्यांनी आईला घडलेला प्रकार सांगितला. सदर फिर्यादीवरून विकास कांदे याच्यावर कलम ३७६ अ ब, ३५४ अ, ५०६ आणि पोक्सो कायद्यान्वये सिरसाळा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. पुढील तपास सहा. पोलीस निरिक्षक श्रीकांत डोंगरे करत आहेत.
मुरूडमध्ये लपलेल्या नराधमास घेतले ताब्यात……!
मुलींच्या घरी झालेली घटना समजल्याचे कळताच विकास कांदे याने पळ काढला. त्याच्या शोधार्थ सहायक निरीक्षक श्रीकांत डोंगरे यांनी पोलीस अंमलदार विष्णू फड, अर्शद सय्यद यांना रवाना केले होते. तो लातूर जिल्ह्यातील मुरूड येथे नातेवाईकाकडे असल्याची माहिती मिळाल्यावरुन पथकाने त्यास मंगळवारी दुपारी ताब्यात घेतले.