#Corona
केज मध्येही कोरोना नियंत्रण पथकाची स्थापना…….!
केज दि.१८ – दिवसेंदिवस राज्यात वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर मुंबई पासून ते गाव पातळीवर उपाययोजना राबवल्या जात आहेत. आणि याचाच एक भाग म्हणून केज नगरपंचायत चे प्रभारी मुख्याधिकारी सुहास हजारे यांनी कोरोना नियंत्रण पथकाची स्थापना केली असून सदरील पथकाची नजर मंगल कार्यालय आणि कोचिंग क्लासेस वर राहणार आहे.
बीड चे जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी सर्व बीडीओ व नगरपालिका, नगरपंचायत यांना मंगल कार्यालय व कोचिंग क्लासेस मध्ये होत असलेल्या कोरोनाच्या नियमाची पायमल्ली होत असल्याच्या पार्श्वभूमीवर करडी नजर ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्या अनुषंगाने केज नगर पंचायत चे प्रभारी मुख्याधिकारी सुहास हजारे यांनी असद खतीब (पथक प्रमुख), अमर हजारे, भास्कर ससाणे आणि सय्यद अतिक ह्या चार सदस्यांचे पथक नेमले आहे. सदरील पथक हे मंगल कार्यालयात जाऊन 50 पेक्षा जास्त लोक असतील, विनामास्क लोक असतील असे कोरोना नियमांचे उल्लंघन होत असेल तर कारवाई करणार आहेत. तसेच कोचिंग क्लासेस मध्येही जर कोरोना विषयक नियम पाळले जात नसतील तर कारवाई प्रस्तावित करेल.
दरम्यान कोरोना पासून बचाव करण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. मात्र अंमलबजावणी कितपत होते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.