केज दि.१८ – एका १५ वर्षीय मुलीस लग्नाचे आमिष दाखवून तिला पुणे येथे पळवून नेले. पुण्यातील एका लॉजवर नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याची घटना घडली. १८ फेब्रुवारी रोजी पीडित मुलगी आणि आरोपी केज पोलिसात ठाण्यात हजर झाले. पीडितेच्या फिर्यादीवरून एका २० वर्षीय तरुणाविरुद्ध बलात्कार व पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला असून न्यायालयाने आरोपीला चार दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
केज तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीचे ९ फेब्रुवारी रोजी पहाटे ५ वाजेच्या सुमारास अपहरण झाल्याची तक्रार पीडित मुलीच्या आईने केज पोलिसात दिली होती. त्यानुसार पोलिसात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान, १८ फेब्रुवारी पीडित मुलगी आणि तिला पळवून नेणारा आरोपी विठ्ठल रतन गायकवाड ( वय २०, रा. आरणगाव ता. केज ) हे दोघे केज पोलीस ठाण्यात हजर झाले. यावेळी पीडित मुलीने दिलेल्या जबाबानुसार आरोपी विठ्ठल गायकवाड याने तिला लग्नाचे आमिष दाखवून गावातून पुणे येथे पळवून नेले. पुणे येथील लॉजवर नेऊन विठ्ठल गायकवाड याने तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवून अत्याचार केला. तिच्या या जबाबावरून आरोपी विठ्ठल गायकवाड याच्याविरुद्ध सदर अपहरणाच्या गुन्ह्यासह कलम ३६६, ३७६, ३७६ ( २) ( आय ) ( जी ) भा.द.वि.सह कलम ४, ६, ८ बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फौजदार दादासाहेब सिद्धे हे पुढील तपास करत आहेत.
दरम्यान, गुरुवारी आरोपीला विठ्ठल गायकवाड याला अंबाजोगाई येथील जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीला २२ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.