आमच्या कुटुंबाला जगू द्या, दुःखातून कसेतरी सावरलो आहोत…….!
बीड दि.21 – आम्हाला कोणाचीही तक्रार करायची नाही, आम्हाला जगू द्या, अशी विनंती पूजा चव्हाणच्या वडिलांनी केली आहे. गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेले आहे. पूजा चव्हाणचे वडील हे तक्रार करण्याच्या मानसिकतेत नसल्याचे स्पष्ट दिसत आहे.
पूजा चव्हाण हिने आत्महत्या केल्यानंतर राजकीय पक्षांनी हे प्रकरण उचलून धरले आहे. सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांच्याकडूनही पूजा चव्हाण प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा सुरु आहे. मात्र, पूजा चव्हाणचे वडील लहू चव्हाण यांनी तृप्ती देसाई यांना विनंती केली आहे. पूजाचे वडील लहूदास चव्हाण यांनी मी तक्रार देणार नसल्याचे स्पष्ट सांगितले आहे.
एक मुलगी गेली मात्र मला पाच मुली आहेत आम्हाला जगू द्या आम्ही यातून आता सावरलो आहोत. मला कोणाबद्दलही तक्रार द्यायची नाही, असं त्यांनी सांगितलं. त्यामुळे आता याप्रकरणात पूजा चव्हाणच्या कुटुंबीयांकडून तक्रार केली जाण्याची शक्यता जवळपास मावळल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरण आता थंडावणार, असा समजलं जात आहे.
दरम्यान, पूजा चव्हाण प्रकरणातील विलास चव्हाण हा एक महत्त्वाचा दुवा असल्याचं मानलं जात आहे. विलासला ताब्यात घेतल्यास अनेक गोष्टींचा उलगडा होऊ शकतो, असं सूत्रांनी सांगितलं आहे. पण विलासही गायब असल्याने हा विलास कोण आहे? तो कुठे आहे? याबाबतचं कोड अद्याप उलगडलं नाहीये.