माझे कुटुंब माझी जबाबदारी नंतर ” मी जबाबदार” मोहीम
मुंबई दि.२१ – माझे कुटुंब, माझी जबाबदारी नंतर आता मी जबाबदार अशी नवी मोहीम राबवण्यात येणार असून आता ऑफिसच्या वेळेची पद्धत बदलावी लागेल. त्यामुळे वर्क फ्रॉम होम केलं तर गर्दी टळेल. तसेच सर्व सामाजिक, धार्मिक, आंदोलनं, यात्रा यावर उद्यापासून पूर्णपणे बंदी असणार आहे. पक्ष वाढवायचा आहे जरुर वाढवा, पण कोरोना वाढवू नका. शासकिय काम झूम मिटींगवर करण्याचे आदेश देण्यात आले असून लोकांनी शिस्त नाही पाळली तर लॉकडाऊन करण्याचा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जनतेशी संवाद साधताना दिला.
तसेच पुन्हा एकदा बंधनं पाळायला लागणार आहेत. अचानक लॉकडाऊन करणं घातक आहे. उद्या रात्रीपासून जिथं जिथं वाटतं तिथं बंधनं घालण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. मात्र अचानक लॉकडाऊन घोषीत न करता चोवीस तासाचा वेळ द्या असेही सांगितले.
दरम्यान सध्या राज्यात 53 हजार सक्रिय रुग्ण असून अमरावती जिल्ह्याची परिस्थिती चिंताजनक आहे. तर मुंबईमध्ये रुग्ण डबल झाले असून कोरोनाची दुसरी लाट दरवाज्यावर धडक मारत असल्याचे सांगितले. तसेच कोविडयोद्धा होता नाही आलं तर कोविड दूत तरी होऊ असा सल्लाही त्यांनी दिला.
येत्या आठ दिवसांत मी सर्व माहिती घेणार असून लॉक डाउन हवा की नको हे तुमच्यावर अवलंबून आहे. ज्या लोकांना हवा असेल ते विना मास्क फिरतील तर ज्यांना नको आहे ते लोक कोरोनाचे सर्व नियम पाळतील. असे उद्धव ठाकरे यांनी जनतेला आवाहन करत लॉक डाउन चा निर्णय जनतेवर सोडला आहे.