मागच्या वर्षीच्या अवकाळीग्रस्तांना मिळणार नुकसान भरपाई……! निधी मंजूर…..!
मुंबई दि.22 – राज्यातील ३० जिल्ह्यात गतवर्षीच्या (२०२०) फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे महिन्यात झालेली गारपीट तसेच अवेळी पावसामुळे शेती पिकांच्या नुकसानीपोटी बाधित शेतकऱ्यांना मदत वाटप करण्यासाठी २४७ कोटी ७६ लाख ५२ हजार रुपये निधी वितरित करण्यासाठी निर्देश देण्यात आले आहेत.
सन २०२० च्या फेब्रुवारी ते मे या कालावधीत झालेल्या गारपीट व अवेळी पावसामुळे राज्यातील ३० जिल्ह्यातील १ लाख ९९ हजार ७७७ हेक्टरवरील शेती पिके, बहुवार्षिक पिकांचे नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले होते. बाधित शेतकऱ्यांना मदत वाटपासाठी शासनाने २४७ कोटी ७६ लाख ५२ हजार रुपये एवढ्या निधीस शासन निर्णयाद्वारे मंजुरी दिली आहे.
औरंगाबाद विभागातील आठ जिल्ह्यातील ५८ हजार ३२५ हेक्टर क्षेत्र बाधित असून, त्यासाठी ५६ कोटी ९६ लाख ७७ हजार रुपये निधी वितरित करण्यात आला आहे. नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांतील ५२ हजार ३५४ हेक्टर क्षेत्र बाधित असून, त्यासाठी ५८ कोटी २४ लाख २५ हजार रुपये निधी वितरित करण्यात आला.