उकळत्या तेलात हात घालून आजही सिद्ध करावी लागतेय चारित्र्यसंपन्नता…..!
उस्मानाबाद दि.२२ – आपण चारित्र्यसंपन्न असल्याचं सिद्ध करण्यासाठी पारधी समाजातील एका महिलेला उकळत्या तेलात हात घालावा लागला होता. जात पंचायतीच्या या अमानुष न्यायनिवाड्याचा प्रकार उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा तालुक्यात घडला आहे. मात्र आता या प्रकरणाला वेगळे वळण मिळालेे असून पीडित महिलेवर गावातील एका व्यक्तीनेे आणि एका पोलीस कर्मचाऱ्यानं लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप पीडिता आणि तिच्या पतीनं केला आहे.
गावातील एक व्यक्ती आणि परंडा पोलीस विभागातील एका कर्मचाऱ्याने संबंधित महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आलाय. नवऱ्याला जेलमध्ये टाकण्याची धमकी देऊन तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला असून सदरील दाम्पत्याने कारवाई करण्याची मागणी माध्यनांसमोर केली आहे.
मागच्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. पारधी समाजातील एका व्यक्तीनं आपल्या पत्नीवर चारित्र्याचा संशय घेतला. आणि समाजातील जातपंचायतीनं महिलेला एक परीक्षा द्यायला सांगितली. संबंधित महिलेच्या पत्नीनं दगडांची चूल मांडली. चुलीत आग लावून कढई ठेवली आणि कढईत तेल ओतलं. ते उकळल्यावर नवरा म्हणवणाऱ्या व्यक्तीने त्या कढईत 5 रुपयांचं नाणं टाकलं आणि उकळत्या तेलात हात घालून ते नाणं काढण्यास संबंधित महिलेला सांगण्यात आलं यामध्ये पीडितेचा हात जळाला आहे.
दरम्यान अशी अमानवी शिक्षा देणाऱ्यांवर जात पंचायत विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करावा आणि आरोपींना कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी अनेक सामाजिक संघटनांनी केली आहे. परंतु या प्रकाराला वेगळेच वळण मिळाल्याने उस्मानाबाद पोलीस या प्रकरणात काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.