केज दि.२२ – शेतात हरभरा पीक काढत असलेल्या २१ वर्षीय महिलेला अश्लील भाषेत शिवीगाळ करून तिचा विनयभंग केल्याची घटना केज तालुक्यात सोमवारी ( दि. २२ ) दुपारी २.३० वाजता घडली आहे. याप्रकरणी बोबडेवाडी ( ता. केज ) येथील एका व्यक्तिविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
केज तालुक्यातील एका गावातील पिडित महिला ही सोमवारी दुपारी २.३० वाजता तिच्या शेतात एकटीच हरभरा काढत होती. हीच संधी साधून आरोपी राजेंद्र पंडित कोटूळे ( रा. बोबडेवाडी ता. केज ) हा तिथे आला. त्याने पीडित महिलेला अश्लील भाषेत शिवीगाळ केली. तुझ्याकडे आता बघतो असे म्हणत तिचा वाईट हेतूने हात धरून विनयभंग केला. महिलेने विरोध करताच आरोपीने तिच्यासोबत हुज्जत घातली. महिलेने ढकलून दिल्यानंतर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला. पीडित महिलेच्या फिर्यादीवरून आरोपी राजेंद्र कोटूळे याच्याविरुध्द केज पोलिसात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस नाईक धनपाल लोखंडे हे पुढील तपास करत आहेत.