आपला जिल्हा
माजलगाव येथील एक वर्षीय बालक बिबट्याच्या हल्ल्यात ठार
बीड दि.२२- सांगली जिल्ह्यातील तडवळे ता. शिराळा येथे बिबट्याच्या हल्ल्यात माजलगाव येथील सुफीयान शमशुद्दीन शेख या एक वर्षाच्या बालकाचा मृत्यू झाला. या बालकाचे आई वडिल ऊस तोडणीसाठी सांगली जिल्ह्यात आलेले असताना ही घटना घडली. घटना आज दि.२२ सोमवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली.
शमशुद्दीन निजामुद्दीन शेख हे आनंदगाव ता. माजलगाव जि बीड येथील रहिवासी आहेत. ते आपली पत्नी व एक वर्षाच्या मुलासह ऊस तोडणीसाठी तडवळे येथे शेतात गेले होते. तडवळे येथील मानकांडे शेतात कृष्णा शामराव पाटील या शेतकऱ्याचा ऊस तोडत असताना मुलगा सुफीयान यास सावलीला मेव्हणीची सात वर्षाची मुलगी तरन्नुम हिच्या सोबत बसवले होते. सर्वजण ऊस तोडण्याच्या कामात मग्न होते. बालका सोबत असलेली तरन्नुम पाणी पीत असताना अचानक उसात दबा धरून बसलेल्या बिबट्याने पाठीमागून सुफीयान याच्यावर झडप घालून त्याची मान पकडून फरफटत नेले. ते पाहून ती मुलगी ओरडल्याने सर्व ऊस तोडणारे तिकडे धावले.मात्र तो पर्यंत बिबट्या मुलास घेऊन उसात गेला. लोकांनी त्याचा पाठलाग केला असता मुलास उसात सोडून बिबट्याने पळ काढला. मुलास घेऊन शिराळा उपजिल्हा रुग्णालयात आणले असता ती मृत झाल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिरुद्ध काकडे यांनी सांगितले.