आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची राज्यातील विद्यार्थ्यांना भावनिक साद……!
मुंबई दि.२४ – काही दिवसांपूर्वी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना कोरोनाची लागण झाली आहे. ते रुग्णालयात उपचार घेत असून तेथूनच राज्यातील विद्यार्थ्यांसाठी त्यांनी एक भावनिक पत्र पाठवलं आहे.
पत्रात त्यांनी लिहिले आहे की, गेल्या वर्षभरापासून आपण कोरोना विरोधात लढाई लढत आहोत. शासनाने याबाबत खंबीर भूमिका आणि ठोस उपाययोजना केल्या आहेत. तसंच अनेक कोरोना योद्धे, विशेषत: डॉक्टर, नर्सेस, आरोग्यसेवक, पोलीस, स्वच्छता कामगार जीवाची पर्वा न करता लढत आहे. यांच्यामुळे आपण कोरोना नियंत्रित करू शकलो, मात्र अद्यापही कोरोना गेलेला नाही, तो पुन्हा डोके वर काढत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सामुहिक लढाई लढावी लागणार आहे, असा संदेश आरोग्यमंत्र्यांनी राज्यातील विद्यार्थ्यांना पत्राद्वारे दिला आहे.
शाळा अन् महाविद्यालये नुकतेच सुरु झाले आहेत. मात्र कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलं आहे. विद्यार्थ्यांनो तुमचं बागडण्याचं, खेळण्याचं आणि मैदानावर घाम गाळण्याचं वय आहे. पण गेल्या वर्षभरापासून आपण घरीच बसून आहात. कोरोनावर मात करण्यासाठी मला तुमची मदत हवी आहे, सर्वप्रथम तुम्ही स्वत:ची काळजी घ्या. आई-वडिल, भाऊ-बहिणी आणि कुटुंबातील लोकांची काळजी घ्या. बाहेरुन आल्यानंतर हात पाय तोंड धुतले जातात का, मास्क वापरला जातो का, कोरोनाच्या नियमावलीचे पालन केले जाते का, हे तुम्ही काळजीपूर्वक पहा.
दरम्यान आजचा विद्यार्थी उद्या देशाचा आधारस्तंभ आहे. तरुणांचं मन सकारात्मक, बुद्धी सतेज आणि शरीर सदृढ पाहिजे, तरच त्याला योग्य वेळी योग्य निर्णय घेता येतात. तर, मग चला मला मदत करणार ना? मला तुमची खात्री आहे. आपण, ही लढाई नक्की जिंकू…. असं भावनिक आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे.