#Corona
चिंताजनक……..! निवासी शाळेतील 229 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण……!
वाशिम दि.२५ – हिंगणघाट आणि लातूर येथे मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर वाशीम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील देगाव येथील एका निवासी शाळेतील ४ शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व वसतिगृहात राहणारे २२९ विद्यार्थी दोन दिवसांत कोरोनाबाधित झाल्याचे आढळून आले आहेत.
जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी आज, २४ फेब्रुवारी रोजी तातडीने या निवासी शाळेला भेट देवून येथील परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच कोरोनाबाधित विद्यार्थ्यांना योग्य उपचार व इतर आवश्यक सुविधा पुरविण्याबाबत सूचना केल्या. या सर्व कार्यवाहीवर देखरेख ठेवण्यासाठी सहाय्यक जिल्हाधिकारी वैभव वाघमारे यांची नोडल अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
बाधित विद्यार्थ्यांना पुरविण्यात येत असलेल्या सुविधा, त्यांची आरोग्यविषयक सद्यस्थिती, आढळलेली लक्षणे याविषयी जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी माहिती घेतली. यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी वैभव वाघमारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, तहसिलदार अजित शेलार, पोलिस निरीक्षक एस. एम. जाधव, तालुका आरोग्य अधिकारी शंकर वाघ यांच्यासह शिक्षक, महसूल, आरोग्य विभागाचे कर्मचारी व शाळेचे प्राचार्य, शिक्षक उपस्थित होते.
दरम्यान दिवसेंदिवस राज्यात कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत जात असून बुधवारी दिवसभरात 8807 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेणे आवश्यक बनले आहे.