केज दि.२६ – केज पोलिसांनी शुक्रवारी शहर आणि ग्रामीण भागात दहा ठिकाणच्या गावठी दारू अड्यावर छापे मारले. पोलिसांनी ६६ हजार ३४० रुपयांचे दारू निर्मितीचे रसायन नष्ट करून ७ हजार ९०० रुपयांची गावठी दारू जप्त केली आहे. याप्रकरणी सात महिलांसह नऊ जणांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
केज पोलीस ठाण्याच्या हद्दीत विनापरवाना आणि बेकायदेशीरपणे गावठी दारू निर्मिती करून चोरून गावठी दारूची विक्री केली जात आहे. या माहितीवरून केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे, फौजदार पोलीस नाईक धनपाल लोखंडे, पोलीस नाईक रुक्मिण पाचपिंडे, पोलीस नाईक अशोक नामदास, पोलीस नाईक बाळासाहेब अंहकारे, पोलीस नाईक अशोक गवळी यांच्या पथकाने शुक्रवारी गावठी दारू अड्यावर छापे मारले. फुलेनगर भागातील पायल शंकर काळे, लताबाई धनराज शिंदे, निलाबाई भागवत शिंदे या महिलांच्या घरी छापा मारून पोलिसांनी ५९० लिटर रसायन नष्ट केले. तसेच कदमवाडी येथील हरिदास बारीकराव काळे याच्या घरी छापा मारून २०० लिटर रसायन तर टाकळी शिवारातील मानमुडी शिवारात अर्चना सूर्यनारायण काळे या महिलेच्या घरी धाड टाकून पोलिसांनी १०० लिटर रसायन नष्ट केले. तसेच केवड येथे फौजदार श्रीराम काळे, जमादार दिनकर पुरी, बाळकृष्ण मुंडे यांनी सुबाबाई परशराम शिंदे यांच्या घरी छापा मारून ७ हजार १०० रुपयांचे रसायन नष्ट केले. तर येवता येथे वसंत मेचन काळे याच्या घरी छापा मारून पोलिसांनी १६०० रुपयांचे रसायन नष्ट केले. तसेच नांदूरघाट येथील पारधी पेढीवर जमादार मुकुंद ढाकणे, पोलीस नाईक सानप यांनी छापे मारून अक्काबाई बापू शिंदे व गिताबाई रवींद्र शिंदे यांच्या घरातील ३ हजार ७०० रुपयांचे रसायन नष्ट करून गावठी दारू जप्त केली. या कारवाईत पोलिसांनी दहा ठिकाणी गावठी दारू अड्यावर ६६ हजार ३४० रुपयांचे दारू निर्मितीचे रसायन नष्ट करीत ७ हजार ९०० रुपयांची गावठी दारू जप्त केली आहे. तर पायल काळे, लताबाई शिंदे, निलाबाई शिंदे, अर्चना काळे, हरिदास काळे, सुबाबाई शिंदे, वसंत काळे, अक्काबाई शिंदे, गिताबाई शिंदे या नऊ जणांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
केवड येथे देशी दारू पकडली
फौजदार श्रीराम काळे, जमादार दिनकर पुरी, बाळकृष्ण मुंडे यांनी केज तालुक्यातील केवड येथील सोनाली राजा पवार या महिलेच्या घरी छापा मारून २ हजार ३४० रुपयांच्या देशी दारूच्या ९० बाटल्या जप्त केल्या. सोनाली पवार या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.