पूजा चव्हाण प्रकरणी थेट न्यायालयात तक्रार दाखल……..!
पुणे दि.27 – मागच्या पंधरा दिवसांपूर्वी पूजा चव्हाण हिने आत्महत्या केल्यानंतर या प्रकरणात आत्तापर्यंत अनेक आरोप-प्रत्यारोप, दावे-प्रतिदावे करण्यात आले आहेत. नुकताच भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी देखील जाहीर पत्रकार परिषद घेऊन पुणे पोलीस योग्य दिशेने तपास करत नसल्याचा आरोप केला आहे. घटनेच्या जवळपास ३ आठवड्यांनंतर देखील पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल न केल्यामुळे त्याविरोधात आता पुण्यात थेट न्यायालयातच तक्रार दाखल करण्यात आली आहे. पुण्यातील वकिलांच्या जस्टीस लीग सोसायटीमार्फत भक्ती राजेंद्र पांढरे यांनी अॅड. विजय ठोंबरे यांच्यामार्फत लष्कर न्यायालयात खासगी तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा अशी प्रमुख मागणी या तक्रारीद्वारे करण्यात आली आहे. युक्तिवादानंतर तक्रारीवर निर्देश देण्यासाठी ५ मार्च तारीख न्यायालयाकडून देण्यात आली आहे.
पुणे पोलीस योग्य पद्धतीने तपास करत नसल्याचा देखील दावा केला जात आहे. ‘प्रसारमाध्यमांमध्ये आणि वृत्तपत्रांमध्ये या प्रकरणावरून मोठी चर्चा सुरू आहे. पूजाच्या अनेक ऑडिओ क्लिप देखील व्हायरल होत असून त्यामध्ये अनेक मोठ्या व्यक्तींची नावे समोर येत आहेत. तरीदेखील त्याचा सखोल तपास होत नसून आरोपी कधीही मृत्यूबाबतचे पुरावे नष्ट करू शकतात’, असं देखील तक्रारीमध्ये नमूद करण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांना तातडीने गुन्हा दाखल करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी तक्रारीद्वारे करण्यात आली आहे.
दरम्यान मागच्या चार दिवसांपूर्वीच खासदार गिरीश बापट यांच्या सुनेनेही पोलीसात तक्रार दाखल केली होती.