केज दि.२८ – सोन्याचे लॉकेट घेण्यासाठी माहेरहून दोन लाख रुपये घेऊन का येत नाहीस या कारणावरून एका २२ वर्षीय विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करीत सासरच्या लोकांनी तिला घरातून बाहेर काढल्याप्रकरणी भाटशिरपुरा ( ता. कळंब ) येथील पतीसह आठ जणांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
केज तालुक्यातील जाधवजवळा माहेर असलेल्या राजकन्या लक्ष्मण उळगे ( वय २२ ) या विवाहितेचा भाटशिरपुरा ( ता. कळब जि. उस्मानाबाद ) येथील लक्ष्मण पांडुरंग उळगे याच्याशी १ मे २०१६ रोजी रितिरिवाजानुसार विवाह झाला होता. लग्नानंतर तिला दोन वर्ष चांगल्या प्रकारे नांदविले. त्यानंतर सासरच्या लोकांनी तु चांगली नाहीस, तुझ्यासोबत लग्न करायचे नव्हते, तु बळच आमच्या घरी आलीस, असे म्हणत माहेरहून सोन्याचे लॉकेट घेण्यासाठी दोन लाख रूपये घेवून ये असा तगादा लावून सतत शिवीगाळ करून मारहान करू लागले. तिला उपाशीपोटी ठेवून मानसिक व शारिरीक छळ करून तिचा जाचजुलूम केला. माहेरहून दोन लाख रुपये घेऊन येत नसल्याने शेवटी तिला जिवे मारण्याची धमकी देवुन घरातुन हाकलुन दिले. अशी फिर्याद राजकन्या उळगे या विवाहितेने दिल्यावरून पती लक्ष्मण उळगे, सासु आश्राबाई उळगे, सासरे पांडुरंग उगळे, दिर रमेश उळगे, रामहरी उळगे, गोविंद उळगे, हनुमंत उळगे, जाउ शितल उळगे या आठ जणांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. जमादार दिनकर पुरी हे पुढील तपास करत आहेत.