उस्मानाबाद दि.३ – लॉकडाऊनच्या काळात बेरोजगारी वाढल्यामुळे शिकून सवरून आपल्या कुटुंबियांना काहीतरी फायदा होईल या उद्देशाने अलीकडच्या काळातील सुशिक्षित बेरोजगार तरुण भूलथापांना सहज बळी पडतात. आणि याचेच एक उदाहरण मंगळवारी कळंब तालुक्यातील पिंपळगाव (डोळा) येथील तरुणांनी उघडकीस आणले असून सदरील प्रकरणात मोठे रॅकेट असल्याचा संशय व्यक्त होत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, गेल्या १ ते २ महिन्यापासून दिपक दिलीप कसबे (वय-३५, रा.दिपेवडगाव ता.केज जि.बीड) याने सुशिक्षित बेरोजगार तरुणांना ‘मी गिरीकंद ट्रॅव्हल्स मध्ये मोठ्या पदावर काम करतो. रुग्णवाहिकेवर ड्रायव्हर व वॉर्डबॉयची मोठी भरती करावयाची आहे. त्याकरिता आपल्याला प्रथम ५००० रुपये तसेच आधार कार्ड, पॅनकार्ड आणि ड्रायव्हिंग लायन्सेसची सत्यप्रत घेवून पुणे येथील ससून हॉस्पिटलमध्ये नियुक्त पत्र, ड्रेस, ओळखपत्र देतो असे सांगितले. त्याच्या भूलथापांना बळी पडून कित्येक तरुणांनी त्याच्यावर विश्वास ठेवला व प्रत्येकी पाच हजार त्याच्या हवाली केले.
नंतर संबंधित फसलेले तरुण पुणे येथे ठरलेल्या ससून हॉस्पिटल येथे गेले असता या महाठगाने नियुक्ती पत्र, ड्रेस, ओळखपत्र देण्याचा बहाणा केला. मात्र त्या ठिकाणी तरुणांना शंका आल्याने त्यांनी अधिक चौकशी केली असता आपली फसवणूक झाली असल्याचे त्यांच्या लक्षात आले. आणि काही वेळातच नाेकरीचे आमिष दाखविणारा ठग तिथून गायब ही झाला. या प्रकरणात बीड, उस्मानाबाद, सोलापूर तसेच इतरही जिल्ह्यातील फसवणूक झालेल्या तरुणांचा समावेश असल्याने फसवणूक करणारे मोठे रॅकेट असल्याची शंका व्यक्त होत आहे.
दरम्यान सदरील गायब झालेला तरुण हा त्याच्या मूळगावी असल्याची माहिती मिळाल्यावरून त्याला तिथे कांही तरुणांनी पकडून चौकशी केली. मात्र तो उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचे लक्षात आल्यानंतर फसलेल्या तरुणांनी त्याला कळंब पोलीस स्टेशनच्या स्वाधीन केले. राजेंद्र पांडुरंग बारगुले यांच्या फिर्यादीवरून कळंब पोलिस स्टेशनमध्ये दिपक दिलीप कसबे याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल सुनिल कोळेकर करत आहेत.