बीड दि.६ – जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढू लागला असून शुक्रवारी (दि.५) गढीच्या नवोदय विद्यालयातील २० जणांना कोरोनाची बाधा झाल्यानंतर शनिवारी (दि.६) आणखी दहा विद्यार्थ्यांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.
बीड जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग मागील काही दिवसांपासून वाढू लागला आहे.शनिवारी (दि.६) आरोग्य विभागाच्या अहवालात १०८ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते.यातील २० जणांचे अहवाल शुक्रवारचे होते.तर ८८ जण नवे रुग्ण सापडले.दरम्यान नवोदय विद्यालयातील पॉझिटिव्ह विद्यार्थ्यांच्या संपर्कात आलेल्यांची अँटीजेन तपासणी निगेटिव्ह आल्यानंतर शनिवारी त्यांची आरटीपीसीआर तपासणी करण्यात आली.यात दहा विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले असून ज्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत त्या विद्यार्थ्यांना पालकांकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी दिली.