#Judgement
बालवयाचा व मतीमंदत्वाचा फायदा घेऊन बलात्कार करणाऱ्या आरोपीस २० वर्ष सश्रम कारावास…….!
बीड दि.९ – सन 2018 मधील जानेवारी महिन्यामध्ये अगर त्या सुमारास यातील अल्पवयीन व मतीमंद पिडीत मुलीचे आई-वडील शेतात गेल्याचे योतील आरोपी नामे तुकाराम पाहून ज्ञानदेव कुडुक, वय-27, रा.तिंतरवणी, ता.शिरूर, जि.बीड याने पिडीतेवर बळजबरीने लैंगिक अत्याचार करून तिस गरोदर होणेस कारणीभूत झाल्याचे सिद्ध झाल्यावरून मा.अतिरीक्त सत्र न्यायालय 6 वे, बीड यांनी आरोपीस 20 वर्ष सश्रम करावास व 20,000/- रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने अतिरीक्त सश्रम कारावास अशी शिक्षा सुनावली आहे.
अधिक माहिती अशी की, दि. 09/07/2018 रोजी श्रीमती केतकी एस. चव्हाण, महिला पोलीस उपनिरीक्षक, बंडगार्डन पोलीस ठाणे, पुणे शहर यांच्या जबाबावरून, पुणे येथील सोफोश सेवाभावी संस्थेमध्ये दाखल असलेल्या अल्पवयीन व जन्मत: मतीमंद मुलीवर तिचे राहते घरी कोणीतरी अज्ञात इसमाने तिच्या बालवयाचा व मतिमंदत्वाचा फायदा घेऊन तीच्याशी जबरदस्तीने शरीरसंबंध करून तीस गरोदर होणेस कारणीभूत झाला होता. याबाबत अज्ञात इसमाविरुध्द पोलीस ठाणे बीड ग्रामीण येथे गु.र.नं. 212/2018 कलम 376(2 ) ()(J)(L) भादंवि सह कलम 3,4,5(K),6 बालकाचे लैंगीक अत्याचारापासून संरक्षण अधिनीयम अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी, सपोनि श्री शितलकुमार बल्लाळ यांनी करून प्रकरणातील महत्वाच्या साक्षीदारांचे जबाब नोंदविले. तपासीक अधिकारी यांनी सखोल तपास करून अज्ञात आरोपीताचा शोध घेतला. तपासाअंती आरोपी तुकाराम ज्ञानदेव कुडुक, वय-27, रा.तिंतरवणी, ता.शिरूर, जि.बीड याचे विरुध्द दिसून येत असलेल्या सबळ पुराव्याच्या आधारावर अंतीम दोषारोप पत्र मा. न्यायालयास सादर केले होते.
दरम्यान सदर प्रकरणाची सुनावणी मा.अतिरीक्त सत्र न्यायालय 6 वे, बीड यांचे न्यायालयात झाली. सदर प्रकरणात दिसून येत असलेल्या सबळ पुराव्याच्या आधारावर आरोपीस 20 वर्ष सश्रम करावास व 20,000/- रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने अतिरीक्त सश्रम करावास अशी शिक्षा सुनावली आहे. सदर प्रकरणात सरकारी पक्षाची बाजू जिल्हा सरकारी वकील ए. डी. राख यांनी मांडली तर पैरवीचे कामकाज एन. वाय. धनवडे यांनी पाहिले.