केज दि.१२ – कोरोनाच्या वाढत्या संक्रमानामुळे प्रशासन सतर्क झालेले आहे. सभा, समारंभ तसेच लग्न सोहळ्यावर कडक निर्बंध लादले आहेत. तर आठवडी बाजारही बंदचे आदेश जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी काढलेले आहेत. मात्र याचे गांभीर्य दिसून येत नाही.
केज शहरात आठवड्यातून मंगळवारी आणि शुक्रवारी असे दोन आठवडी बाजार भरतात. तालुक्यातील बहुतांश गावात मोठ्या प्रमाणावर भाजीपाल्याचे उत्पादन घेतल्या जाते. बाजार दिवस सोडूनही दररोज लोक केज शहरात भाजीपाला विक्रीसाठी येतात. लॉक डाउन मध्ये तर याचा अतिरेक झाला होता. कित्येकवेळा भाजीपाला विक्रेत्यांना आपापला भाजीपाला टाकून परत फिरावे लागले होते. मात्र याचा कसलाच धडा घेतलेला दिसून येत नाही.
दरम्यान मागच्या कांही दिवसांपूर्वी आठवडी बाजाराचे आदेश निर्गमित करून सक्त कारवाईचे आदेश दिले. मात्र शुक्रवार दि.१२ रोजी खेड्यापाड्यातून आलेल्या भाजीपाला विक्रेत्यांनी सदरील आदेश धुडकावत लावून मेन रोडवरच आपले बस्तान मांडले असून एचपीएम च्या अर्धवट कामावर दुतर्फा आपली दुकाने लावली असून बाजार भरवला आहे.
सदरील रोडवर एका बाजूने वाहतूक सुरू असून मोठमोठ्या वाहनांसह उसाचे ट्रॅक्टर ची वाहतूक सुरू असून मोठा अपघात सुद्धा होण्याची भीती निर्माण झाली आहे. मात्र याची कसल्याच प्रकारची दखल न घेता आपला व दुसऱ्याचा जीव धोक्यात घालून बाजार सुरू आहे.
केजचे तहसीलदार दुलाजी मेंडके स्वतः हातात काठी घेऊन शिस्त लावण्यासाठी उन्हातान्हात फिरत आहेत. मात्र लोक कसल्याच प्रकारचे गांभीर्य घेत नसल्याने आता मात्र सक्त कारवाईची गरज आहे.