कोरोनाची लस घेतल्यानंतर प्रमाणपत्र गरजेचे……..!
मुंबई दि.१६ – पहिल्या टप्प्यात प्राधान्याने कोविड योद्ध्यांसाठी लसीकरण मोहिम राबवल्यानंतर आता देशभरात 1 मार्चपासून लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरु झाला आहे. त्यामुळे लस घेण्यासाठी सर्वत्र धावपळ सुरु झाली आहे. मात्र लस घेतली म्हणजे आपली जबाबदारी संपली असे नाही. लस घेतल्यानंतर मिळणारे प्रमाणपत्र भविष्यात अत्यंत आवश्यक ठरणार असल्याने ते जपून ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे.
देशभरात दुस-या टप्प्यातील लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली आहे. आरोग्य विभागामार्फत सध्या मोफत तसेच काही खासगी केंद्रांमध्ये सशुल्क लस दिली जात आहे. कोरेानाचा वाढता प्रादुर्भाव पाहता लस घेण्यासाठी नागरिकही जबाबदारीने गर्दी करीत आहेत.मात्र लस घेतली म्हणजे आपली जबाबदारी संपली, असे नाही. तर लसीकरणानंतर मिळणारे प्रमाणपत्र किंवा पोचपावती जपून ठेवावे लागणार आहे. भविष्यात आरोग्य विमा कंपनीकडून हे प्रमाणपत्र मागण्याची शक्यता आहे.
दरम्यान लसीकरणाच्या प्रमाणपत्रावरील 13 आकडी संदर्भ क्रमांक जवळ बाळगणे फायद्याचे ठरणार आहे. तसेच पारपत्र काढण्यासाठी, आंतरराष्ट्रीय, आंतरराज्यीय प्रवासासाठीही या प्रमाणपत्राची विचारणा होऊ शकते. लाईफ इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, हॉटेलमध्ये ॲडमिशन, ऑपरेशन आदीच्या वेळीही लसीकरणाच्या प्रमाणपत्राची गरज भासणार आहे. यासंदर्भात एलआयसीच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली असता, त्यांनीही याला दुजोरा दिला आहे.