#Judgement
अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीस २० वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा……!
बीड येथील मा.अतिरीक्त सह जिल्हा विशेष न्यायालय, बीड यांचा निकाल
बीड दि.१६ – अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिच्या गर्भधारनेस कारणीभूत झाल्याचे सिद्ध झाल्यावरून एकास 20 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा बीड येथील मा.अतिरिक्त सह जिल्हा विशेष न्यायालयाने सुनावली आहे.
अधिक माहिती अशी की, 12/10/2020 रोजी सायंकाळी 19.30 वा. सुमारास बँक कॉलनीचे भिंती लगत असलेल्या काटेरी झुडपामध्ये, पेठ बीड येथे यातील आरोपी लव ऊर्फ राहुल भगवान चांदणे, वय-19 वर्ष, रा.रामगव्हण, ता.अंबड, जि.जालना, ह.मु.भेंडा, ता.नेवासा, अहमदनगर याने पिडीत मुलगी ही अल्पवयीन आहे, हे माहिती असतांना देखील तिचे पाठीमागून जावुन बळजबरी करत तिचेवर बलात्कार केला व तिचे गर्भधारणेस कारणीभूत झाला होता. सदर प्रकरणी पोलीस ठाणे पेठ बीड अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला होता.
सदरील प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक आर. बी. बनकर यांनी करून आरोपी विरूध्द सबळ पुरावा संकलीत केला होता. आरोपी विरूध्द दिसून येत असलेल्या सबळ पुराव्याच्या आधारावर मा.न्यायालयास अंतीम दोषारोप पत्र सादर करण्यात आले. प्रकरणांची सुनावणी मा.अतिरीक्त सह जिल्हा विशेष न्यायालय, बीड यांच्या न्यायालयात झाली. आरोपीविरूध्द दिसून आलेल्या सबळ पुराव्याच्या आधारावर मा. न्यायालयाने आरोपीतास कलम 4 बालकांचे लैंगीक अत्याचारापासून संरक्षण अधीनीयम अन्वये 20 वर्ष सश्रम करावासाची शिक्षा व 10,000/- रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने अतिरीक्त सश्रम करावास तसेच कलम 506 भादंवि अंतर्गत (06) महिने सश्रम करावास व 1000/- रुपये दंड दंड न भरल्यास एक महिना अतिरीक्त कारावास अशी शिक्षा सुनावली आहे. सदर प्रकरणात सरकारी पक्षाची बाजू श्रीमती एम. एम. दराडे यांनी मांडली तर पैरवीचे कामकाज मपोना/1993 सी. एस. नागरगोजे यांनी पाहिले.