केज दि.१७ – तालुक्यातील शेतकऱ्यांचे महावितरण कंपनीकडून गेल्या महिनाभरापासून विनापरवानगी व बेकायदेशीररित्या कुठल्याही प्रकारची पूर्वसूचना न देता विद्युत कनेक्शन खंडित केले जात आहेत.
याच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शुक्रवार दि.19 रोजी रास्ता रोको करण्याचा इशारा संघटनेचे जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे यांनी दिला आहे.
विजे अभावी शेतकऱ्यांचे उभ्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. आधीच अतिवृष्टी व त्या अगोदर दुष्काळाने ग्रासलेल्या शेतकऱ्यांना या वर्षी रब्बी हंगामात चांगले पीक आले होते. मात्र महावितरणच्या हुकूमशाही मुळे शेतकरी आज नेस्तनाबूत झाला आहे. राज्य शासनाने अगोदर लॉकडाऊन काळातील वीजबिल माफ करू अशी घोषणा केल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता. मात्र राज्य शासनाने आपला शब्द फिरवल्यामुळे शेतकऱ्यावर अस्मानी-सुलतानी संकट कोसळले आहे. लॉकडाऊन काळातील वीज बिल माफ व सक्तीचे वीज बिल वसुली तात्काळ थांबवावी व खंडित केलेला वीज पुरवठा तात्काळ जोडून द्यावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना बीडच्या वतीने जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे यांच्या नेतृत्वाखाली केज शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे 19 मार्च 2021 रोजी सकाळी 11 वाजता रास्ता रोको आंदोलनाचे आयोजन केले असून परिसरातील व तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी सदर रास्ता रोको आंदोलनात सहभागी होऊन महावितरण कंपनी विरोधात आपला आवाज बुलंद करावा
असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.