सहा जणांचा जीव घेणारा ट्रक चालक पोलिसांनी घेतला ताब्यात……!
बीड दि.१७ – दारूच्या नशेत रिक्षा, दुचाकी, पिकअप या तीन वाहनांना धडक दिल्याने सहा जणांना आपला प्राण गमवावा लागला होता. बीड ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत दि. 7 मार्च रोजी पांगरबावडी परिसरात सदरील घडली होती. अपघात झाल्यानंतर ट्रक चालक फरार झाला होता. मात्र मंगळवारी बीड ग्रामीण पोलिसांनी त्याला अटक केली. प्रकाश संजय चौरे (रा. नारेवाडी ता. केज, जि. बीड) असे त्या ट्रकचालकाचे नाव आहे. सदरील ट्रक चालक हा सरकी घेऊन बीड येथे आला होता. सायंकाळी उशीर झाल्यामुळे रात्री गावाकडे थांबण्यासाठी बीडहून ट्रक (एम.एच.०९ सी.व्ही.९६४४) घेऊन वडवणीमार्गे गावी जात होता. त्यावेळी पांगरबावडी जवळ एका प्रवासी रिक्षाला जोराची धडक दिली. यात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला होता. तसेच नंतर पुढे एका दुचाकी व मालवाहू रिक्षालादेखील धडक दिली होती. या अपघातात दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाला होता. अपघात झाल्यानंतर ट्रकचालक चौरे फरार झाला होता. या प्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मंगळवारी ग्रामीण पोलिसांनी त्याला अटक केली. न्यायालयात हजर केले असता त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.